लॉस एंजेलिस – पृथ्वीच्या पाठीवर 5 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाचे जीवाश्म अवशेष ओळखण्यात संशोधकांना यश आले आहे. या अतिविशाल पक्ष्याच्या पंखांचा आकार तब्बल 21 फुट इतका होता आणि सध्याच्या काळातील सर्वात मोठ्या अल्बॅट्रोसेस पक्षाच्या पंखांचा पसारा फार फार तर 11 ते साडे 11 फुटांपर्यंत असतो.
त्यामुळे सध्याच्या काळातील सर्वात मोठा पक्षीही त्यापुढे अगदी छोटा दिसू शकेल. हे जीवाश्म 1980 साली अंटार्टिकात सापडले असून आता नामशेष झालेल्या अदक्षिण समुद्री क्षेत्रात विहंग करणाऱ्या सर्वात विशाल पक्ष्यांचे स्वरुप यामुळे जगासमोर आले.
जीवाश्म सापडलेल्या या पक्ष्याला पेलागोर्निथिडस असे नाव देण्यात आले आहे. पृथ्वीवरील सागरी क्षेत्रात संचार करणाऱ्या 6 कोटी वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात असलेल्या या पक्षाची प्रजाती सध्याच्या काळातील अल्बॅट्रोसेसशी साधर्म्य दाखवते.
सर्वात लहान पेलागोर्निथिडचे जीवाश्म 6 कोटी 20 लाख वर्षांपूर्वीचे आहेत. त्यातील सर्वात अलिकडच्या काळातील जीवाश्म 5 कोटी वर्षांपूर्वीचे असून पक्ष्याच्या पायाचे आहेत. साडे 6 कोटी अर्षांपूर्वी नष्ट झालेल्या डायनॉसॉर आणि पक्ष्यांच्या पुनरुज्जिवित झालेल्या प्रजातींचेच हे जीवाश्म आहेत.
यातील दुसरे जीवाश्म पक्ष्याच्या जबड्याच्या हाडाचे आहेत. त्याचा कालावधी 4 कोटी वर्षांपूर्वीचा असाव असा अंदाज “सायंटिफिक रिपोर्टस’ या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये व्यक्त केला आहे. या पक्ष्यांच्या जीवाश्मावरूनच हे किमान अतिविशाल पक्षी असल्याचा अंदाज करता येऊ शकतो, असे अमेरिकेतील बर्कले कॅलिफोर्निया विद्यापीठातील विद्यार्थी पीटर क्लोस यांनी सांगितले.
पेलागोर्निथिडचे सर्वात अलिकडील जीवाश्म 25 लाख वर्षांपूर्वीचे म्हणजेच पृथ्वीचे तापमान थंड होत असताना आणि हिमयुगाचा प्रारंभ होत असतानाच्या काळातील आहेत. या पक्ष्यांच्या जबड्यामध्ये हाडांची रचना अणकुचीदार दातांसारखी असायची.
अनेक आठवडे समुद्राच्या पाण्यावरून उडताना ते या जबड्यात माशांना उचलून घ्यायचे. डायनॉसॉरच्या काळात पंख असणाऱ्या टेरोसॉर नावाच्या प्राण्यांचीही एक प्रजाती होती. त्याच्या पंखांचा पसारा तब्बल 33 फुटांपर्यंत असायचा, असे संशोधकांचे म्हणणे आहे.