कोची – केरळ सोने तस्करीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी निलंबित आयएएस अधिकारी एम.शिवशंकर यांना अटक केली. त्या घडामोडीनंतर विरोधी पक्षांनी आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारत केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
सोने तस्करी प्रकरणाचा तपास ईडी आणि सीमा शुल्क विभागाकडून केला जात आहे. त्या यंत्रणांच्या रडारवर असल्याने शिवशंकर यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी दोन अर्ज केले होते. मात्र, ते अर्ज केरळ उच्च न्यायालयाने फेटाळून लावले.
त्यानंतर लगेचच ईडीचे पथक थिरूवनंतपूरममधील आयुर्वेद रुग्णालयात पोहोचले. तिथे उपचार घेत असलेल्या शिवशंकर यांना ताब्यात घेण्यात आले. तिथून चौकशीसाठी त्यांना कोचीतील ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले.
सोने तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश हिने चौकशीवेळी शिवशंकर यांच्याशी असलेल्या लागेबांध्यांची माहिती दिली. त्यामुळे शिवशंकर यांच्या चौकशीसाठी ईडी सरसावली आहे. शिवशंकर हे विजयन यांचे माजी प्रधान सचिव आहेत.
सोने तस्करी प्रकरणावरून संशयाच्या घेऱ्यात आल्याने शिवशंकर यांना केरळ सरकारने निलंबित केले. आता त्यांच्या अटकेवरून विरोधकांनी डाव्या पक्षांच्या सरकारला आणखी आक्रमकपणे घेरण्यास सुरुवात केली आहे.
थिरूवनंतपूरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5 जुलैला सुमारे 15 कोटी रूपयांचे सोने जप्त करण्यात आले. तस्करीमार्गे पाठवण्यात आलेले ते सोने राजनैतिक स्वरूपाच्या सामग्रीत दडवण्यात आले होते. त्यामुळे केरळमध्ये राजकीय खळबळ उडाली.
त्याप्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली. त्यामध्ये थिरूवनंतपूरममधील संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दूतावासातील माजी कर्मचारी आणि मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश हिचाही समावेश आहे.