अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बिडेन अध्यक्षीय निवडणूकीच्या शर्यतीत

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बिडेन यांनी पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूकीच्या शर्यतीत उतरायचे निश्‍चित केले आहे. डेमोक्रॅटिक पक्षामधून उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी आजपासून अधिकृतपणे मोर्चेबांधणीला सुरुवात केली. बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या काळातील उपाध्यक्ष म्हणून केलेल्या कामाच्या जोरावर आपल्याला डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी मिळू शकेल, असा विश्‍वास बिडेन यांनी व्यक्‍त केला आहे. आज ट्विटरवर एक व्हिडीओ प्रसिद्ध करून बिडेन यांनी आपला मनोदय स्पष्ट केला.

बिडेन यांनी केलेली अनधिकृत घोषणा म्हणजे 2020 मध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या पूर्वतयारीचे पडघम मानले जायला लागले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षामध्येच किमान 20 इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे. या गर्दीमध्ये आणखी बिनचेहऱ्याचे उमेदवारही आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत.

76 वर्षीय बिडेन हे आयुष्यभर राजकीय वर्तुळातच राहिलेले आहे. वर्मोन्ट सेन, बर्नी सॅन्डर्स यासारख्या आघाडीच्या नेत्यांबरोबर ते अल्पावधीतच आघाडीचे नेते बनले आहेत. पक्षासाठी निधी संकलनाची जबाबदारी त्यांनी यापूर्वी यशस्वीपणे पार पाडली आहे. डेमोक्रॅटिक पक्षामध्ये बिडेन यांच्या तोडीचा आंतरराष्ट्रीय आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असलेला दुसरा नेताच नाही. यापूर्वी 1998 आणि 2008 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याचा बिडेन यांचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. 2016 मध्ये त्यांच्या मुलाचे मेंदूच्या कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यामुळे त्यांनी अध्यक्षीय निवडणूक लढवली नव्हती. बिडेन वयाच्या 29 व्या वर्षी पहिल्यांदा सिनेटमध्ये निवडून गेले होते. जर अध्यक्षांच्या निवडणूकीत ते विजयी झाले तर 78 व्या वर्षी अध्यक्ष होणारे ते पहिलेच व्यक्‍ती असतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.