- पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ : आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना
पिंपरी – पोलिसांनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत “रिपाइं’च्या माजी मावळ तालुका अध्यक्ष अमित छाजेड याने फिनेल पिऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सोमवारी (दि. 31) सायंकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे देहूरोड शहर, मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली.
अमित माणिक छाजेड (रा. पोर्टर चाळ, देहूरोड) असे फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या “रिपाइं’च्या माजी पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
देहूरोड मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी अमित छाजेड यांनी उपोषण सुरू केले होते. हे उपोषण मागे घेण्यासाठी व्यापारी संघटनेकडून दोन लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी छाजेड यांच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 29) खंडणीचा गुन्हा दाखल झाला. छाजेड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर “रिपाइं’मधून त्याची तात्काळ हकालपट्टीही करण्यात आली. आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तसेच देहूरोड पोलीसही आपले म्हणणे ऐकून घेत नाही. यामुळे त्याने सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिनेल पित आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही धक्कादायक बाब लक्षात येता पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी छाजेड याला सुरवातील तालेरा आणि त्यानंतर पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. सध्या छाजेड यांच्यावर उपचार सुरू आहेत.