पुणे – राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत सोमवारी संपली. यंदा आयटीआय प्रवेशासाठी 2 लाख 97 हजार 792 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 9 हजार 500 अर्जांची संख्या वाढली आहे.
आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू झाली. त्यानंतर दोनदा मुदतवाढ देण्यात आली. सोमवारी अर्जाची अंतिम मुदत संपली. त्यांनतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने अर्जाची आकडेवारी प्रसिद्ध केली.
यंदा 3 लाख 24 हजार 863 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 97 हजार 792 विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यातील 2 लाख 88 हजार 599 विद्यार्थ्यांनी अर्जाचे शुल्क भरले. तर, 2 लाख 76 हजार 38 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम निवडले. यावर्षी प्रवेशाची क्षमता 1 लाख 45 हजार 632 एवढी आहे. त्यातुलनेत यंदा दुपटीने विद्यार्थ्यांचे अर्ज आले.