काठमांडू – सोन्याच्या तस्करीमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून नेपाळ संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या माजी सभापतींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले कृष्ण बहादुर महारा हे सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी सेंटर) पक्षाचे उपाध्यक्ष देखील आहेत.
कपिलवस्तू जिल्ह्यातील पकाडी येथे अटक केल्यानंतर त्यांना भैरव विमानतळावरून चौकशीसाठी राजधानी काठमांडूला आणण्यात आले आहे. तेथे आणल्यानंतर त्यांना तातडीने लाझिमपत येथील नेपाळ पोलिसांच्या सेंट्रल इन्वहेस्टिगेशन ब्युरोमध्ये नेण्यात आले.
त्यांच्या विरुद्ध खटला तयार केला जाईल आणि ऍटर्नी जनरल कार्यालयाकडे पाठवला जाईल. कोठडी वाढवण्यासाठी महारा यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे, असे सीआयबीच्या प्रवक्त्याने सांगितले.
नेपाळमधील व्यापक सोने तस्करीच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश नेपाळचे पंतप्रधान राबी लामिछाने यांनी रविवारी पोलिसांना दिले होते. सोने तस्करीमध्ये महारा यांचा हात असल्याचा ठपका या अहवालामध्ये ठेवण्यात आला आहे.
महारा आणि नेपाळचे माजी पोलीस प्रमुख आणि कम्युनिस्ट पार्ट ऑफ नेपाळ (यूएमएल) चे नेते सर्वेंद्र खनाल यांच्याविरोधात सीआयबीने जाणीवपूर्वक तपास न केल्याचा आरोप देखील हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या या आयोगाने केला आहे.
हा अहवाल लामिछाने यांनी पंतप्रधान प्रचंड यांना सादर केला आणि शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालाची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोटरसायकलींच्या ब्रेक बुटांमध्ये दडवलेले ६० किलो आणि ई-सिगारेटमध्ये लपवलेले ९ किलो सोने २०२२ च्या डिसेंबरमध्ये पकडण्यात आले होते. त्याच्या तपासात पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप होत होता.