नवी दिल्ली-कर्नाटकचे माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना गुरूवारी सीबीआयने अटक केली. एका भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणात सामील असल्याच्या आरोपावरून ती कारवाई करण्यात आली.
भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांची कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यात 2016 मध्ये हत्या करण्यात आली. गौडा यांच्यावर त्यांच्या जिममध्येच अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला.
संपत्तीच्या वादातून गौडा यांची हत्या झाल्याचा निष्कर्ष स्थानिक पोलिसांनी काढला. त्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने कर्नाटक सरकारच्या शिफारसीवरून हाती घेतला. राजकीय वैमनस्यातून गौडा यांची हत्या झाल्याचे सीबीआय तपासातून समोर आले. त्यानंतर कुलकर्णी सीबीआयच्या रडारवर आले. त्यांची गुरूवारी दिवसभर चौकशी करण्यात आली.
समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. कर्नाटकात 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत कुलकर्णी कॉंग्रेसच्या तिकिटावर धारवाडमधून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 2016 मध्ये त्यांची तत्कालीन कॉंग्रेस सरकारमध्ये मंत्री म्हणून वर्णी लागली. मात्र, नंतरच्या निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावे लागले.