माजी राज्यपाल वेद मारवाह कालवश

पणजी – झारखंडचे माजी राज्यपाल आणि दिल्लीचे माजी पोलीसप्रमुख वेद मारवाह यांचे शुक्रवारी रात्री गोव्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते.

सुमारे तीन आठवड्यांपूर्वी मारवाह गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी कोसळले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. मारवाह यांनी 1985 ते 1988 या कालावधीत दिल्ली पोलीस आयुक्‍तपदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी नॅशनल सिक्‍युरिटी गार्डचे (एनएसजी) महासंचालकपद भूषवले. जम्मू-काश्‍मीर आणि बिहारच्या राज्यपालांचे सल्लागार म्हणून त्यांनी काही काळ कार्य केले.

त्यांची 1999 मध्ये मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्‍ती झाली. त्यानंतर मिझोरम आणि झारखंडचे राज्यपालपदही त्यांनी भूषवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक मान्यवरांनी मारवाह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्‍त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.