सराव सुरू झाल्याने मानसिक समाधान

अश्‍विनी पोनाप्पाने व्यक्त केल्या भावना

बंगळुरू – करोनाच्या सावटातून काहीसा दिलासा मिळाल्यामुळे तसेच लॉकडाऊनमध्ये सवलती दिल्याने सराव पुन्हा सुरू झाला याचेच समाधान जास्त आहे, असे मत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू अश्‍विनी पोनाप्पा हिने व्यक्‍त केले आहे.

मार्च महिन्यापासून करोनाचा धोका वाढल्याने देशात लॉकडाऊन लावला गेला. आता त्याचा पाचवा टप्पा सुरु झाला आहे. त्यात जनतेला दिलासा देताना सरकारने अनेक सवलती दिल्या. त्यातच देशातील मैदाने व क्रीडा संकुले खुली करण्याची परवानगीदेखील दिली. ज्या संकुलात देशातील राष्ट्रीय क्रीडा संघटनांचे तसेच माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे शिबिर सुरू झाले त्या ठिकाणी सहभागी होणे ज्या खेळाडूंना शक्‍य आहे ते सहभागी होत आहेत. सध्या येथील प्रकाश पदुकोन बॅडमिंटन अकादमीत सुरू झालेल्या शिबिरात अश्‍विनीने सहभाग घेतला. तीन महिन्यांनी कोर्टवर उतरण्याची संधी मिळाल्याचा आनंद तिने व्यक्‍त केला. अश्‍विनीसह उदयोन्मुख खेळाडू लक्ष्य सेन याच्यासह एकूण 20 खेळाडू या शिबिरात सहभागी झाले आहेत.

मार्चपूर्वी ज्या स्पर्धा जाहीर झाल्या होत्या त्या एकतर स्थगित झाल्या आहेत तर काही स्पर्धा रद्दच करण्यात आल्या होत्या. त्यामुळे खूप मानसिक नैराश्‍य आले होते. करोनाचा धोका संपुष्टात आल्यावर थेट स्पर्धेत कसे सहभागी व्हायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. सरकार व भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) सराव शिबिरांना परवानगी दिल्याने मला पुन्हा एकदा इतक्‍या कालावधीनंतर सरावासाठी कोर्टवर उतरता आले याचेच जास्त समाधान आहे, अशा शब्दांत अश्‍विनीने आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सध्या येथे सराव केला जात आहे. येथे 20 कोर्ट सज्ज करण्यात आले असून खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षकासह सर्व नियमांचे पालन करून सराव करता येत आहे. आता येत्या दिवसांत सराव सत्रातील सरावाचे वेळापत्रक वाढवून पूर्वीप्रमाणे सकाळी 3 तर संध्याकाळी 3 तास सराव करण्याचे निश्‍चित केले आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात डाएट व तंदुरुस्ती यांकडे जरी लक्ष दिले असले तरीही ते वैयक्‍तिक पातळीवरच होते. आता व्यावसायिक मार्गदर्शकांकडून सल्ले घेत सर्व नियोजन करता येणार आहे, असेही अश्‍विनी म्हणाली.

सरावात नियमितता येईल – विमलकुमार…

सध्या या शिबिरात खेळाडू हलका सराव व व्यायाम करत आहेत. तीन महिन्यांच्या खंडानंतर एकदम पूर्वीप्रमाणे सराव करणे योग्य नाही. खेळाडूंचा सराव पूर्वीसारखा सुरू होण्यासाठी आणखी किमान 4 आठवडे आवश्‍यक आहेत. या काळात त्यांनी दोन सत्रात सराव सुरु केला असला तरी सरावात नियमितता येण्यासाठी काही अवधी लागेल, असे मत अकादमीचे मुख्य प्रशिक्षक विमलकुमार यांनी व्यक्‍त केले

Leave A Reply

Your email address will not be published.