पिंपरी – मंडल अधिकारी महिलेने विरोधात निकाल दिल्याने तिला दमदाटी करत ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. तसेच अधिकारी महिलेचा रस्ताही अडविल्याप्रकरणी माजी नगरसेवक काळूराम पवार यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 5) दुपारी मंडल अधिकारी कार्यालय, लांडेवाडी, भोसरी येथे घडला.
संबंधित महिला अधिकाऱ्याने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अशोक किसन बहिरवाडे (रा. गवळीवाडा, चिंचवड स्टेशन), राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक काळूराम मारुती पवार, सागर बहिरवाडे (रा. गवळीवाडा, चिंचवड स्टेशन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी “तू आमच्या विरोधात निकाल का दिला. तू इथे नोकरी कशी करते तेच मी बघतो’ अशी धमकी देत फिर्यादीकडील कागदपत्रे हिसकावण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर चिखली येथे बैलगाडा शर्यती असल्याने बैलगाडा शर्यतीच्या घाटाचा पंचनामा करण्यासाठी फिर्यादी जात असताना आरोपींनी त्यांच्या गाडीची चावी हिसकावून घेतली आणि रस्ता अडवून शासकीय कामात अडथळा आणला. आरोपी काळूराम पवार याने फिर्यादी यांना “तुझ्यावर ऍट्रोसिटीची केस करून तुला जेलमध्ये टाकतो’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.