सातारा -सातारा नगरपालिकेच्या एका माजी पदाधिकाऱ्याचा मुलगा सनी भोसले याला पिस्तूल दाखवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी माजी नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे याला शहर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना सुमारे दीड वर्षापूर्वी तालीम संघाजवळ घडली होती.
याबाबत माहिती अशी, बाळू खंदारेसह 15 जणांवर प्राणघातक हल्ला, शस्त्रास्त्र कायद्यान्वये 8 सप्टेबर 2021 रोजी गुन्हा दाखल झाला होता. सनी भोसले हे सहकाऱ्यांसोबत तालीम संघाजवळून जात असताना, त्यांच्या कारमधील काही युवकांनी बाळू खंदारेच्या कार्यालयाकडे पाहून शिवीगाळ केली होती. त्यावरुन बाळूने सनी भोसले यांना फोन करुन त्याबाबत जाब विचारला. त्यानंतर त्याने सनीला तालीम संघावर बोलावले. तेथे बाळू खंदारे व त्याच्या साथीदारांनी पिस्तुलाचा धाक दाखवून सनी भोसले व त्याच्या सहकाऱ्यांना मारहाण केली होती.
या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही संशयितांची धरपकड केली होती, तर काही जण पसार झाले होते. बाळू खंदारेने अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज फेटाळला गेल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या अटकपूर्व जामिनाचे प्रकरण दीड वर्ष न्यायालयात प्रलंबित होते. उच्च न्यायालयानेही पंधरा दिवसांपूर्वी बाळू खंदारेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर बाळू खंदारे सोमवारी सकाळी सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाला.
पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी त्याला अटक करुन दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयात पोलिस व बचाव पक्षामध्ये जोरदार युक्तिवाद झाला. पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी खंदारेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.