जम्मू – जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी केंद्र सरकारच्या विविध धोरणांना विरोध दर्शवत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. आज भाजपची वेळ आहे.
पण, उद्या आमची वेळ येईल. अमेरिकेतील निवडणुकीत पराभूत झालेले मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखीच भाजपची गत होईल, असे इशारेवजा भाकीत मेहबुबा यांनी केले.
पीडीपीच्या प्रमुख असणाऱ्या मेहबुबा येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करण्याचे आश्वासन भाजपने देशातील जनतेला दिले. ते आश्वासन पूर्ण करणे तर सोडाच; जनतेला दोन वेळचे जेवण पुरवण्यातही भाजपला अपयश आले.
जातीय विद्वेषाचे राजकारण करून तो पक्ष खऱ्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष वळवत आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्याचा मुद्दा त्या पक्षाकडून देशातील मतदारांपुढे मांडला जात आहे. त्यामुळे मी बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीचे नेते तेजस्वी यादव यांचे अभिनंदन करू इच्छिते. तेजस्वी यांनी अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारखे मुलभूत मुद्दे तेथील निवडणुकीत केंद्रस्थानी आणले, असे त्या म्हणाल्या.
भाजपकडून विरोधकांवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून निशाणा साधला जातो. मात्र, भाजप हाच देशातील सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे. त्या पक्षाने भ्रष्टाचाराबाबत सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. त्या पक्षाने मोठमोठी कार्यालये उभी केली आहेत. त्यासाठी पैसा येतो कुठून? सत्तेतून बाहेर पडण्याआधी भाजप देशाची सर्व साधनसंपत्ती विकून मोकळा होईल, अशा आरोपांची सरबत्ती मेहबुबा यांनी केली.