नवी दिल्ली – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) आजपासून 15 नोव्हेंबरपर्यंत ब्रिटनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान जयशंकर हे ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेव्हर्ली यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्यांच्याशिवाय ब्रिटनच्या काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचीही जयशंकर भेट घेणार आहेत.
भारत आणि ब्रिटन (india britan) दरम्यानचे द्विपक्षीय संबंध पूर्वीपेक्षा अधिक वृद्धिंगत झाले आहेत. दोन्ही देशांनी 2021 मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी केली आहे, तसेच दोन्ही देशांनी 2030 पर्यंतच्या उद्दिष्टांबाबतचा “रोडमॅप’ देखील निश्चित केला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटनच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
भारत आणि ब्रिटन दरम्यान मुक्त व्यापार करारासाटीच्या वाटाघाटी सुरू आहेत. यासाठीच्या चर्चेला 2022 पासून सुरुवात झाली आणि या चर्चेची 12 वी फेरी या वर्षी 8 ते 31 ऑगस्ट दरम्यान झाली असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यात 3 नोव्हेंबर रोजी मुक्त व्यापार कराराच्या चर्चेतील प्रगती संदर्भात फोनवरून चर्चा देखील झाली आहे.