नवी दिल्ली – अमेरिका आणि चीनने (America china) एकमेकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याबाबत सहमती दर्शवली आहे, असे अमेरिकेच्या अर्थ मंत्री जेनेट येलेन (Janet Yellen) यांनी म्हटले आहे. चीनचे उपपंतप्रधान हे लेफांग दोन दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी येलेन यांची भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर येलेन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरिकेमधील चीनची गुंतवणूक न्म्म्यिाने कमी व्हावी, असे आम्हाला वाटत नाही. तसे झाल्यास अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांना त्याचा फटका बसेल. पर्यायाने संपूर्ण जगच अस्थिर होईल, असेही येलेन म्हणाल्या.
येलेन आणि हे लेफांग यांच्यातील चर्चेमुळे अमेरिका आणि चीन दरम्यानचे संबंध अधिक सुधारण्यास मदत होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात पुढील आठवड्यात सॅन फ्रान्सिस्को येथे होणाऱ्या आशिया-प्रशांत आर्थिक मंचच्यानिमित्ताने भेट होणार आहे. त्यावेळी दोन्ही नेत्यांच्या चर्चेची पूर्वतयारी झाल्याचेही येलेन म्हणाल्या. हे लेफांग यांनी येलेन यांना चीन दौऱ्याचे निमंत्रण दिले आहे. ते आपण स्वीकारल्याचेही येलेन म्हणाल्या.
डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये चीन आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध ताणले गेले होते. आशिया खंडातील चीनचा विस्तारवाद, तैवानवर चीनकडून केला जात असलेला दावा, युक्रेनवरील हल्ल्याबाबत चीनने रशियाला दिलेला पाठिंबा आणि व्यापारी कारणांमुळे दोन्ही देशांमधील तणाव सतत वाढतच गेला होता. मात्र आता चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यावर हा तणाव कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.