मुंबई- सप्टेंबरअखेर संकलित केलेल्या आकडेवारीनुसार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक वाढून 667 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.
जून अखेर झालेल्या गुंतवणुकीच्या तुलनेत या गुंतवणुकीत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र आगामी काळात महागाई वाढण्याच्या शक्यतेमुळे आणि डॉलर वधारणार असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणुकीचा ओघ कमी होईल की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. सप्टेंबर 2020 मध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूक केवळ 398 अब्ज डॉलर इतकी होती. परदेशातील म्युच्युअल फंड, मालमत्ता व्यवस्थापन संस्था भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू लागल्या आहेत.
गेल्या दीड वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक वाढविली असल्याचे दिसून येते. जर भारतीय शेअर बाजारात परदेशी संस्थागतगुंतवणूक कायम ठेवायची असेल तर एक तर भारतातील कंपन्यांचे नफे वाढले पाहिजे. त्याचबरोबर रुपयाचे अवमूल्यन टाळले पाहिजे.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदार चीनमध्ये अगोदर गुंतवणूक करीत होते. मात्र गेल्या दोन वर्षापासून चीनचे इतर देशाशी संबंध खराब झाले आहेत.
त्याचबरोबर चीनकडून आयात कमी होऊ लागली आहे. त्यामुळे चीनमध्ये होणारी गुंतवणूक भारतात आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे या क्षेत्रातील विश्लेषकांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यानंतर मात्र परदेशी गुंतवणुकीचा ओघ कमी होत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढ करण्याच्या शक्यतेवर विचार चालू असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काही परदेशी गुंतवणूकदार थांबा आणि पहा अशी भूमिका घेत आहेत.
सुट्टीमुळे शेअर बाजार बंद
धार्मिक उत्सवामुळे शुक्रवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे कामकाज बंद होते. शनिवारी आणि रविवारी शेअर बाजारांना साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे आता शेअर बाजाराचे कामकाज सोमवारी सुरू होईल. शेअर बाजाराबरोबरच चलन बाजारही शुक्रवारी बंद होते.