वाघोली, (प्रतिनिधी)- हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. 21 संचालकांच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत वाघोलीमधून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
हवेली तालुक्यातील राजकीयदृष्ट्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने वजनदार अशा वाघोली गावातून कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणुकीच्या रिंगणात रामकृष्ण सातव पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरून भरघोस मतांनी विजयी होऊन नवा इतिहास रचला आहे.
सहकार क्षेत्रात या निवडणुकीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यासाठी वाघोली ग्रामस्थांच्या साथीने शेतकऱ्यांच्या विकासाचा आलेख उंचावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात माजी उपसरपंच मारुती गाडे, माजी सरपंच
जयश्री राजेंद्र सातव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण हेमचंद्र सातव पाटील या तिघांनी एकत्र येऊन ग्रामस्थांच्या पाठबळावर तसेच पंचक्रोशीतील नागरिकांचे विश्वासावर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याप्रसंगी माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, कमल बाग सोसायटीचे चेअरमन संतोष पायगुडे, हवेली तालुका भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील, प्रसाद सातव पाटील, तात्या शिंदे, मंगेश सातव, केतन जाधव, अजिंक्य कांचन, सागर काळभोर, दीपक गावडे, सूरज चौधरी, सचिन काळे, अतुल शिंदे, नानासाहेब आबनावे, मुकेश सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
वाघोली आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या साथीने तसेच सर्वांना सोबत घेऊन यशवंत सहकारी साखर कारखाना पुन्हा यशवंत हा किर्तीवंत करण्यासाठी कार्य करणार आहोत.- जयश्री राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच, वाघोली.