पिंपरी – मुंबई महापालिकेच्या हद्दीत चारचाकी वाहनातून कुटुंबीयांसोबत प्रवास करत असताना मास्क लावण्याची आवश्यकता नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर पुणे शहरातही या नियमामध्ये शिथिलता आणत चारचाकी वाहनामध्ये मास्क लावण्याचा सक्तीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
पुणे शहराच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरातही चारचाकी वाहनामध्ये मास्क लावण्याची सक्ती असणार नाही. याबाबत महापौर माई ढोरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांमधून प्रवास करत असताना मास्क घालण्याकरिता बंधन उठवावीत, अशी मागणी होत होती.
याबाबत निर्णय घेऊन चारचाकी वाहनामधून प्रवास करत असताना मास्क वापरण्याची अट रद्द केली आहे. त्यानुसार चारचाकी वाहनामधून प्रवास करत असताना मास्क परिधान करण्याची आवश्यकता नसेल. मात्र ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून, वाहनांमध्ये कुटुंबातील सदस्य असणे आवश्यक आहे.