2017 मध्ये आर माधवन आणि विजय सेतुपति यांचे लीड रोल असलेल्या “विक्रम वेधा’ या दक्षिणात्य सिनेमाचा हिंदी रिमेक करण्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. हिंदी रिमेकमध्ये आमीर खान काम करणार होता अशी चर्चा होती.
मात्र अनेक कारणांनी आमीरने या सिनेमातून माघार घेतली. त्याच्यानंतर हृतिक रोशनशी चर्चा झाली आणि त्याने तयारीही दाखवली होती. मात्र आता हृतिक रोशननेदेखील विक्रम वेधाच्या रिमेकमधून माघार घेतल्याचे समजते आहे.
त्याऐवजी “द नाईट मॅनेजर’च्या हिंदी आवृत्ती करण्याला हृतिकने तयारी दाखवली आहे. हृतिक बऱ्याच वेळेला ऐनवेळेस सिनेमाला नकार देतो. जोपर्यंत तो फ्लोअरवर शूटिंगला दाखल होत नाही तोपर्यंत त्याला गृहीत धरता येत नाही. त्यामुळे निर्माते अडचणीत येऊ शकतात.
आताही विक्रम-वेधाच्या हिंदी रिमेकसाठी हृतिक उपलब्ध आहे असे गृहीत धरून निर्मात्यांनी तयारी सुरू केली होती. मात्र आता पुन्हा नवीन हिरो शोधावा लागणार आहे. हृतिक या वर्षाच्या शेवटी “फायटर’चे शूटिंग सुरू करणार आहे. त्यानंतर “क्रिश-4’चे शूटिंग चालू होईल असा अंदाज आहे.