Ravichandran Ashwin : खेळावरच लक्ष केंद्रित – अश्‍विन

अहमदाबाद – विक्रमांचा विचार करणे सोडून दिले आहे. त्यापेक्षा आपल्या कामगिरीवरच जास्त लक्ष केंद्रित करण्याला माझे प्राधान्य आहे, असे मत भारताचा अव्वल ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्‍विन याने व्यक्त केले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत अश्‍विनने 400 बळींचा टप्पा गाठला. त्या पार्श्‍वभूमीवर भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या 619 बळींच्या विक्रमाला मागे टाकण्याबाबत विचारणा होत असलेल्या प्रश्‍नावर अश्‍विनने हे मत व्यक्त केले आहे.

अनिल कुंबळेची बरोबरी करण्यासाठी मला अद्याप 218 बळींची आवश्‍यकता आहे. मुळातच मी विक्रमांचा विचार करणे सोडून दिले आहे. मैदानात उतरल्यानंतर मी स्वत:च्या खेळात अधिक सुधारणा कशी करता येईल, याचाच विचार करतो. त्याशिवाय गेल्या तीन-चार वर्षांपासून मी फक्त कसोटी संघाचाच भाग आहे. त्यामुळे स्वत:ची तंदुरुस्ती राखणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे निवृत्त होईपर्यंत ही दोन ध्येये ठेवूनच खेळणार आहे, असेही अश्‍विन म्हणाला.

बायोबबल सुरक्षेवरही त्याने आपले मत मांडले. विलगीकरणाच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याने अनेक खेळाडूंनी याविषयी तक्रार केल्याचे समोर आले आहे. मात्र, याच काळात संघातील खेळाडू एकमेकांचे अधिक चांगले मित्र झाले असून त्यांच्यातील एकजूट वाढली आहे, असे तो म्हणाला.
बायोबबल वातावरणात कुटुंबीयांपासून दूर राहणे कोणत्याही खेळाडूसाठी आव्हानात्मक असते, परंतु यामुळे आम्हा खेळाडूंना एकमेकांसह अधिक वेळ घालवण्याची संधी मिळते. मैदानावर सराव करण्याशिवाय हॉटेलमध्येही आम्ही एकत्रच वेळ घालवतो. या नियमांमुळे ड्रेसिंग रूममधील वातावरणातही मोठे बदल झाले आहेत, असेही अश्‍विन म्हणाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.