शिक्षण विभागाचा कारभार प्रभारींकडेच

7 पैकी सध्या दोनच पदांवर पूर्णवेळ संचालक कार्यरत

 

पुणे – शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या कार्यालयांच्या रिक्‍त संचालक पदे भरण्याऐवजी प्रभारी सूत्रे सोपवून कामकाज रेटले जात आहे. 7 पैकी सध्या दोनच पदांवर पूर्णवेळ संचालक कार्यरत असून उर्वरित 5 पदांवर प्रभारीच कारभार पाहत आहेत. पात्र, अधिकाऱ्यांना त्या त्या कालावधीत पदोन्नत्या दिल्यास प्रभारी नेमण्याची नामुष्की ओढवणार नाही.

प्राथमिक शिक्षण संचालकपदी दत्तात्रय जगताप, बालभारतीच्या संचालकपदी दिनकर पाटील यांच्या पूर्णवेळ नियुक्‍त्या झाल्या आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे संचालक या पदांची सूत्रे प्रभारींकडे सोपवली आहेत. बालचित्रवाणी हा विभाग बंद झाल्यामुळे याचे संचालकपद रद्द केले. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या संचालक पदावर “आयएएस’ अधिकाऱ्यांची वर्णी लावली.

अधिकाऱ्यांना ठराविक कालावधीनंतर कामाचा अनुभव पूर्ण झाल्यानंतर पदोन्नत्या दिल्याच पाहिजेत. नियत वयोमानुसार रिक्‍त पदेही वर्षानुवर्षे भरली जात नाहीत. पदोन्नत्या सतत लांबणीवर पडल्याने रिक्‍त पदांवर इतर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या नियुक्‍त्या करण्यात येतात.

अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण विभागाचे संचालक सुनील चौहान हे नुकतेच नियतवयोमानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पदांचा अतिरिक्‍त कार्यभार पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्याकडे दिला. सुपे यांच्याकडे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त व अध्यक्ष या दोन्ही पदांचा अतिरिक्‍त कार्यभार आहे. त्यात आता आणखी एका विभागाची भर पडली आहे. काही प्रकरणांच्या विभागीय चौकशा सुरू असल्याने सुपे यांना संचालक पदावर पूर्णवेळ पदोन्नती देण्यात अडसर निर्माण झालेला आहे.

राज्य मंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्‍त कार्यभार दिनकर पाटील यांच्याकडे, तर माध्यमिक शिक्षण संचालक पदाचा अतिरिक्‍त कार्यभार हा दत्तात्रय जगताप यांच्याकडे सोपविला आहे. विद्या प्राधिकरणाच्या संचालक पदाचा अतिरिक्‍त कार्यभार हा प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातील सहसंचालक दिनकर टेमकर यांच्याकडे आहे.

पदोन्नत्यांसाठी वाट पहावी लागणार

राज्यातील शिक्षण विभागातील संचालक पदांच्या पदोन्नत्यांसाठी तुकाराम सुपे, शरद गोसवी, महेश पालकर, दिनकर टेमकर, कृष्णकांत पाटील या पाच अधिकाऱ्यांचे नंबर लागणार आहेत. मात्र, त्यांना पदोन्नत्यांसाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे. यात ठराविक कार्यालयात पदोन्नती मिळविण्यासाठी यांच्यात स्पर्धाही लागणार आहे. पदोन्नत्या मिळविण्यासाठी “त्या’ सर्व परीक्षांच्या चक्रातूनही या सर्वांना जावेच लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.