कुआलालांपूर (मलेशिया) – मलेशियात आलेल्या प्रलयकारी पूरात मरण पावलेल्यांची संख्या 41 झाली आहे. आणखीन 8 जण अजूनही बेपत्ता आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक अक्रिल सनी अब्दुल्ला सनी यांनी प्रसार माध्यमांना दिली. मरण पावलेल्या 41 जणांपैकी सेलांगोरमध्ये 25, पेहांगमध्ये 15 आणि केलांतानमधील एकाचा समावेश आहे. पूराचा फटका 6 राज्यांना बसला आहे. पूरामुळे विस्थापित झालेल्यांची संख्या आता 46 हजारांपर्यंत खाली आहे.
अनेक भागातील विस्थापितांनी आता पुन्हा आपापल्या प्रांतांमध्ये स्थलांतर करायला सुरुवात केली आहे. स्थलांतरितांपैकी बहुसंख्य जण कुआलालांपूरमधीलआश्रय छावण्यांमध्येच रहात आहेत. त्यांच्या रहाण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
पूर्व किनाऱ्याजवळील पेहांग या प्रांताला पूराचा सर्वात मोठा फटका बसला होता. या प्रांतातील 26 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. तर सेलांगोर प्रांतातील 18 हजार जणांना सुरक्षित आश्रय छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.
मलेशियाच्या दक्षिणेकडील द्विपकल्पामध्ये जूनही पावसाचा इशारा देण्यात येतो आहे. त्याचबरोबर उत्तरेकडील साबाह आणि सारवाक या बोर्निओ या प्रांतांमध्येही शनिवारी आणि रविवारी मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.