पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणातील आरोपी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीसचा तात्कालिन व्यवस्थापक अश्विनकुमार याच्या घरात दोन किलो सोने आणि 25 किलो चांदी सापडली आहे. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने त्याच्या घराची झडती घेतली होती. यामध्ये हा ऐवज आढळला. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परीक्षेचे आयुक्त तुकाराम सुपे याच्या नातेवाईकांकडूनही 20 लाखाची रोकड हस्तगत करण्यात आली. त्याने ही रक्कम नातेवाईकांकडे ठेवण्यास दिली होती. त्याच्याकडे आजवर साडेतीन कोटीपेक्षा मालमत्ता आढळली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणाचा सखोल तपास सुरू असताना या परीक्षेतील 2018 च्या निकालात घोटाळा झाल्याचे उजेडात आले. याप्रकरणी सुखदेव हरी डेरे (61 , रा. सुखयश निवास, अकोले बाह्यवळण मार्ग, संगमनेर, जि. अहमदनगर) तसेच जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीसचा संचालक अश्विनकुमार (49 , रा. एचआरबीआर ले आऊट, कल्याणीनगर, बंगळुरू, कर्नाटक) यांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम नामदेव सुपे याच्यासह शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर तसेच संजय शाहूराव सानप यांना अटक करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती राज्यभरात पसरली असून ही परीक्षा घेण्याची जबाबदारी बंगळुरूतील जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस कंपनीकडे सोपविण्यात आली होती.
सखोल चौकशीत शिक्षक पात्रता परीक्षा 2018 च्या निकालातही गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालिन आयुक्त सुखदेव डेरे तसेच अश्विनकुमार या गैरव्यवहारात सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
याप्रकरणाची व्याप्ती राज्यभर पसरली असून पोलिसांची काही पथके ठिकठिकारी रवाना करण्यात आली आहे. तुपे याने नातलग आणि मित्र मंडळींकडे मोठ्या प्रमाणात रोकड वापरायला किंवा ठेवायला दिली होती. ती रक्कम पोलिसांकडून हस्तगत करण्याचे काम सुरु आहे.