नागपुरात पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या

नागपूर: हैदराबाद आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावरून देशभरात संतापाचे वातावरण असतानाच नागपूरात असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील कळमेश्वर परिसरातील शेतात एका पाच वर्षीय चिमुरडीचा दगडाने ठेचलेला मृतदेह आढळून आला. या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या बालवाडीत शिकणारी ही मुलगी गुरुवारपासून बेपत्ता होती. तेव्हापासून पोलिसांकडून या मुलीचा शोध सुरु होता.

अखेर पोलिसांना काल सकाळी लिंगा परिसरातील शेतात या मुलीचा मृतेदह आढळून आला. तिच्या तोंडात कापड व काड्या कोंबण्यात आल्या होत्या. तसेच दगडाने ठेचण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. गावकऱ्यांनी घटनास्थळी जमा होत पोलिसांविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या.

यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करून हे विकृत कृत्य करणाऱ्या 32 वर्षांच्या नराधमाला अटक केली आहे. संजय पुरी असे या नराधमाचे नाव आहे. तो शेतमजुरी करतो. दारू पिऊन त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी संजय पुरी विरोधात खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी दोन जणांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.