थकित कर्जदारांच्या मालमत्तेवर जप्तीची टाच

दत्तात्रय गायकवाड

वाघोली – पुणे शहरालगत असलेल्या हवेली तालुक्‍यात जमिनींना सोन्याचा भाव आला होता. त्यावेळी जमिनी विकून भूखंड पाडणाऱ्या शेतकरी आणि गुंठामंत्र्यांनी जमीन विक्रीतून आलेल्या पैशांतून ऐश केली. यात चंगळवादी संस्कृतीला कवटाळेल्या तरूणाईने कर्जाच्या माध्यमातून वाहने दिमतीला आणली.

बॅंका, पतसंस्था आणि वित्तीय पतपुरवठा करणाऱ्या खासगी कंपन्यांकडून पूर्व हवेलीत सुमारे 300 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा केला आहे. मात्र, सात वर्षांत जमीन खरेदी- विक्रीतून फसवणुकीच्या घटना, बांधकाम व्यवसायातील मंदी, आदी कारणांमुळे पूर्व हवेलीतील वित्तीय संस्थांच्या कर्जवसुलीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे सात वर्षांपूर्वी ज्या पूर्व हवेलीतून सोन्याचा धूर निघत होता. त्याठिकाणी बॅंकांच्या धडक कर्जवसुलीमुळे कर्जदारांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटून आली आहे.

पुणे शहराचा उपनगरीय भाग म्हणून पूर्व हवेलीचा भाग ओळखला जात आहे. याच भागातील नागरिकांचे राहणीमान दिवसेंदिवस बदलत आहे. बदलत्या राहणीमाननुसार नागरिकांच्या गरजा बदलल्या आहेत. अनेक व्यवसाय, गृहप्रकल्पांसाठी नागरिकांनी विविध बॅंकांची कर्जे घेऊन दैनंदिन गरजा भागवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्व हवेलीतील 39 गावांत 50 सहकारी आणि राष्ट्रीयकृत बॅंका आहेत. तसेच 50 पतसंस्था आहेत. पुणे शहरातील वित्तीय पुरवठा करणाऱ्या खासगी कंपन्या कार्यरत आहेत. यातून सुमारे 300 कोटी रुपयांवर कर्जपुरवठा केल्याची चर्चा सहकार क्षेत्रातील जाणकारांतून होत आहे.

अनेक धनदांडग्यांनी कर्जाच्या माध्यमातून वाहने खरेदी केली आहेत. गर्भश्रीमंत व गुंठामंत्र्यांच्या दारात गाड्या उभ्या राहिल्या आहेत. हवेलीतील एकूण 39 गावांमध्ये राहणीमानाचा बदलता प्रभाव दिसून येऊ लागला आहे. मात्र, विविध कारणांमुळे अर्थकारणाला मरगळ आली आहे. त्याचा परिणाम कर्जदारांकडून कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे बॅंकांनी कर्जवसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे.

त्यामुळे बॅंकांची कर्जवसुली कर्जदारांना महागात पडत आहे. वाघोली, लोणी काळभोर, उरळीकांचन, लोणीकंद आदी मोठ्या लोकसंख्येच्या गावांच्या भागांमध्ये विविध बॅंकांच्या वतीने मालमत्ता जप्ती, वाहनांना जप्त करण्याचे व ताब्यात घेण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे कर्जदार आणि जामीनदारही धास्तावले आहेत. बॅंकांनी नियमाला अधीन राहून पवित्रा घेतल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

हवेली तालुक्‍यात कर्जदार आणि जामीनदारांचा जीव टांगणीला : वित्तीय संस्थांकडून थकितांवर धडक कारवाई

कोणत्याही बॅंकेकडून अथवा पतसंस्थेकडून घेतल्या गेलेल्या कर्जाचा पुरवठा वेळेवर केला तर कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची गरज नाही. मात्र, थकलेल्या कर्जाच्या बाबतीत कारवाई होत आहे. हे टाळण्यासाठी सभासद, कर्जदारांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. – गणेश कुटे, चेअरमन, नीलकंठेश्‍वर नागरी सहकारी पतसंस्था, वाघोली.

वाहन कर्जांच्या थकबाकीचे प्रमाण सर्वाधिक – 
पूर्व हवेलीतील अनेक भागांमध्ये बदलत्या राहणीमानाचा विचार करून अनेकांनी महागडी चारचाकी वाहने तसेच दुचाकी वाहने खरेदी केली आहेत. भौतिक सुविधांच्या मागे धावणाऱ्या तरूणाईला गाड्यांचा मोह टाळता आला नाही. या वाहनांसाठी अनेकांनी विविध बॅंकांकडून तसेच अर्थसाह्य पुरवणाऱ्या अनेक फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन ही वाहने खरेदी केली आहेत.

मात्र अनेकांनी बऱ्याच दिवसांपासून वाहनांच्या कर्जापोटी घेतलेल्या रकमेचे हप्ते वेळेवर न भरल्याने सध्या वाहनांच्या ताब्यात घेण्याचे प्रकार आणि संबंधित नागरिकांच्या घरून वाहने जप्त करून बॅंकांच्या कार्यात नेण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

कर्जाची थकबाकी देखील वाढली – पूर्व हवेलीतील अनेक नागरिकांनी लहान-मोठे व्यवसायांमध्ये गुंतवणूक करून अशा व्यवसायाची उभारणी केली आहे. या व्यवसायाच्या उभारणीसाठी कर्जाचा पुरवठा करणाऱ्या अनेक नामांकित बॅंकांकडून कर्ज घेऊन व्यवसाय दिमाखदारपणे थाटले. मात्र, या व्यवसायातील वर्षानुवर्षे कर्जाच्या हफ्त्यांची परतफेड न केल्याने बॅंकांकडून हॉटेल, व लहानमोठी व्यवसायांच्या दुकानांवर देखील आता बॅंकांकडून जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. यात संबंधित दुकाने, हॉटेल आता बॅंकांकडून सील केले जात आहे. या प्रकारामुळे बॅंकांचा कडक पावित्रा पाहून नागरिकांची सामाजिक-आर्थिक पत ढासळली असल्याचे द्योतक आहे.

प्रतिष्ठित व्यक्‍तींची प्रतिष्ठा पणाला
विविध फायनान्स, तसेच पतसंस्था, बॅंकांकडून कर्ज घेण्यामध्ये प्रतिष्ठित व्यक्‍तींचे प्रमाण जास्त आहे. प्रतिष्ठित व्यक्‍तींच्या वाहनांवर मालमत्तेवर जप्तीची कारवाई होत असल्याने संबंधित प्रतिष्ठित व्यक्‍तींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तालुक्‍यात बॅंका, पंतसंस्थांच्या धडक वसुलीचा चर्चा जोर धरू लागली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)