स्वच्छ भारत अभियानात पाचगणी, महाबळेश्‍वरचा गौरव

पाचगणी – केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2018′ व “स्वच्छ सर्वेक्षण 2019′ या दोन्ही वर्षात महाबळेश्‍वर आणि पाचगणी नगरपालिकेने उल्लेखनीय केलेल्या कार्याचा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी वित्तमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगरविकास प्रधानसचिव मनीषा म्हैसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जमशेद भाभा थिएटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथील कार्यक्रमात महाबळेश्‍वर नगरीच्या नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली कुमार शिंदे यांनी महाबळेश्‍वरकरांच्या वतीने तर पाचणगीकरांच्यावतीने नगराध्यक्षा सौ लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महाबळेश्‍वर पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, नगरसेवक कुमार शिंदे नगरसेविका शारदा ढाणक, अफ्रिन वारुणकर तर पाचगणी पालिकेच्या सुलभा लोखंडे, उज्ज्वला महाडिक, प्रवीण बोधे, दिलावर बागवान आदी उपस्थित होते. या दोन्ही पालिकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या “स्वच्छ सर्वेक्षण 2018′ व “स्वच्छ सर्वेक्षण 2019′ या दोन्ही सर्वेक्षणात महाबळेश्‍वर पालिकेने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले.स्वच्छतेतील सातत्य, लोकसहभागामुळे केवळ दोनच वर्षात महाबळेश्‍वर मध्ये स्वच्छतेची एक चळवळ उभी राहिली आहे आणि “आपलं महाबळेश्‍वर, स्वच्छ सुंदर’ हे ब्रीद यशस्वी झाले आहे.

शहरवासीयांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी प्रत्येक प्रभागात “नगराध्यक्षा आपल्या दारी’, “रन फॉर क्‍लिन महाबळेश्‍वर’ मॅरेथॉन स्पर्धा, स्वच्छता मोहिमा, पर्यटकांमध्ये कागदी पिशव्यांचे वाटप,ओल्या व सुक्‍या कचरा कुंड्यांचे वाटप, काळवंडलेल्या भिंतींवर आकर्षक रंगरंगोटी, फलकांच्या माध्यमातून जनजागृती असे उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आले. महाबळेश्‍वर आणि पाचगणी पालिकेने राज्यातच नव्हे तर देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या कामगिरीमुळे केंद्र शासनाने केलेल्या “स्वच्छ सर्वेक्षण 2018’च्या सर्वेक्षणात पश्‍चिम विभागातील नॉन – अमृत प्रवर्गात महाबळेश्‍वर शहराचा अकरावा गुणानुक्रम आला तर “स्वच्छ सर्वेक्षण 2019′ मध्ये देखील पालिकेने उल्लेखनीय कामगिरी बद्दल नॉन अमृत प्रवर्गात राष्ट्रीय पातळीवर आठवा गुणानुक्रम मिळविला.

दरम्यान, पाचगणी नगरपरिषदेने 2018 मध्ये स्वच्छ सर्वेक्षणातील देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल व सन 2019 मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात पुन्हा स्वच्छ सर्वेक्षणातील थ्री स्टार रेटिंगमध्ये पुन्हा देशपातळीवर 13 वे रॅंकिंग मिळाले. पांचगणी नगरपरिषदेने स्वच्छतेमधील आपले स्थान अबाधित राखीत स्वच्छतेची चळवळ अधिक जोमाने चालू आहे. पांचगणी शहरामध्ये स्वच्छतेचा जागर चालू ठेवला आहे. यामध्ये घनकचरा प्रकल्प, ई टॉयलेट्‌स, नॅपकिन व्हेंडिंग मशीन, याच बरोबर घरोघरी डस्टबीन च्या माध्यमातून कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची पांचगणीकरांना लावलेली सवय, या सर्वाचे फलित म्हणजे हा पुरस्कार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)