शेवगाव (प्रतिनिधी) -शेवगाव तालुक्यात काल अखेर पुणे, मुंबई व देशांतर्गत जोखिमग्रस्त भागातून 10 हजार 893 व्यक्ती तालुक्यात आल्या आहेत. त्यापैकी 5 हजार 40 नागरिकांच्या हातावर होम क्वॉरन्टाइनचे शिक्के मारले आहेत. तर परदेशातून 7 नागरिक येथे आलेले आहेत. त्यांच्या सर्व तपासण्या झालेल्या असून त्या निगेटीव्ह आल्या आहेत. आज अखेर तालुक्यात एकही करोनाबाधीत रुग्ण नाही. सर्वांनीच आतापर्यंत पाळलेल्या स्वयंशिस्तीचे हे फलित असल्याचे मत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी व्यक्त केले आहे.
करोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्या अगोदर मुंबई, पुण्यासह देशातील इतर भागातील नागरिक गावाकडे आले आहेत. तालुक्यातील अशा व्यक्तींची यादी करण्यात आली आहे. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र हातगाव अंतर्गत जिल्ह्याबाहेरुन आलेल्या 1 हजार 257 व्यक्तिंपैकी 767 जणांना शिक्के मारण्यात आले. तसेच दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 599 पैकी 507, भातकुडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र – 631 पैकी 525, घोटण प्राथमिक आरोग्य केंद्र- 1 हजार 442 पैकी 908, हातगाव प्राथमिक आरोग्य केंद्र- 1 हजार 735 पैकी 1 हजार 105, तर चापडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात 1 हजार 229 पैकी एक हजार 228 व्यक्तिंना, अशा तालुक्यात जिल्ह्याबाहेरून आलेल्या एकूण 10 हजार 893 व्यक्तिपैकी 5 हजार 40 व्यक्तिंच्या हातावर शिक्के मारण्यात आले आहेत. उर्वरित व्यक्तिंच्या हातावर शिक्के मारण्याचे काम दोन दिवसात पूर्ण होणार आहे. या व्यक्तींना घरातच राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तालुक्यात कुठल्याही व्यक्तीला करोनाची लक्षण दिसून आलेली नाहीत. नागरिकांनी या रोगाला घाबरून न जाता घराबाहेर पडू नये, स्वतःची व कुटूबांची काळजी घ्यावी, असे आवाहन शासनाच्या सर्व एजन्सीज समन्वयाने करत आहेत.
तालुक्यातील कऱ्हेटाकळी व महालटाकळी या ठिकाणी जिल्हा सिमा सिलबंद केलेल्या आहेत. तेथे पोलीस, महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात आहेत. तालुक्यातील बहुतांश गावात जंतूनाशक औषधांची फवारणी युद्ध पातळीवर चालु असून सर्व गावांमध्ये फवारणी केली जाणार आहे. शेवगावातील एकनाथ आयुर्वेद रुग्णालयात उपचार केंद्र तयार करून सज्ज करण्यात आले आहे. गाव पातळीवर समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत.
दवाखाना व शासकीय वाहने सुस्थितीत सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालय शेवगाव व बोधेगाव तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र दहिगावने,भातकुडगाव, ढोरजळगाव, चापडगाव, घोटण व हातगाव व 37 आरोग्य उपकेंद्रे सज्ज आहेत. तहसीलदार भानुदास गुंजाळ, नायब तहसीलदार मयूर बेरड, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. रामेश्वर काटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, मुख्याधिकारी अंबादास गरकळ, विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर व सर्व खातेप्रमुख तालुका स्तरावर समन्वय राखून अहोरात्र लक्ष्य ठेवून आहेत.