रेखा जरे खून प्रकरण : मारेकऱ्यांच्या शोधासाठी पाच पथके रवाना

नगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने पाच पथके नियुक्‍त केली आहेत. काल रात्री उशिरा नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेने नगर शहरासह जिल्ह्यातील सर्वच क्षेत्राला मोठा हादरा बसला आहे.

रेखा जरे यांच्या सॅन्टो कारचा कट लागल्याने मोटारसायकवरुन आलेल्या दोघा जणांनी पाठलाग करत जरे यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येते. तथापि, केवळ कट लागल्याने असा हल्ला होण्याची शक्‍यता नसल्याचाही दावा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी हा घातपात असल्याचा संशय समाजमाध्यमांत व्यक्‍त करण्यात येत आहे.

दरम्यान, जरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी घोषित केले. खासगी कामानिमित्त जरे सोमवारी पुण्यात गेल्या होत्या. महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने यांच्यासह जरे यांच्या आई व लहान मुलगा त्यांच्यासमवेत नगरला येत होते.

शिरुर ते सुपा दरम्यान असलेल्या जातेगाव घाटात त्यांना दोन हल्लेखोरांनी अडवले. त्यावेळी एकाने जरे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात जरे गंभीर जखमी झाल्या व जागीच गतप्राण झाल्या. जरे यांच्या आई सिंधुबाई सुखदेव वायकर (वय 60, रा. माळी बाबळगाव, ता. पाथर्डी, जि. नगर) यांनी त्याबाबत सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन भा.द.वि. कलम 302, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधुबाई वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी (दि.30) नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे आठ ते आठ वाजेच्या सुमारास मोटरसायकलवरुन (क्रमांक एम.एच. 17, 2380) साधारण तिशीच्या वयोगटातील दोन इसम आले. त्यांच्या मोटारसायकला धक्का लागला असल्याचे म्हणत त्यांनी रेखा यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद सुरु असतानाच एकाने धारदार शस्त्राने रेखा यांच्या गळ्यावर वार करून तिला ठार मारले.

त्यातील मोटरसायकल चालवणाऱ्याने डार्क ब्राऊन रंगाचे लेदर जॅकेट, जीन्स व पायात स्पोर्ट शूज घातलेले होते. त्याला दाढी व मिशी होती. तर दुसऱ्या आरोपीने काळ्या रंगाचा शर्ट, जीन्स व पायात स्पोर्ट शूज घातलेले होते, अशी माहिती सिंधुबाई वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीत देण्यात आली आहे.

 एलसीबीसह पाच पथके…!
रेखा जरे यांचे मारेकरी शोधण्यासाठी नियुक्‍त करण्यात आलेल्या पथकांत स्थानिक गुन्हे शाखा, सुपा पोलिस ठाणे, पारनेर पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलिस ठाणे व तोफखाना पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कोण आहेत रेखा जरे पाटील…!
रेखा जरे पाटील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या त्या पदाधिकारी होत्या. तथापि, अलिकडेच त्यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला होता. कार्यकर्त्या म्हणून त्या राष्ट्रवादीत सक्रीय होत्या. मराठा क्रांती मोर्चा आयोजनात त्यांचा मोठा सहभाग होता. आंदोलनात महिलांची फळी उभी करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. अलिकडेच यशस्विनी महिला ब्रिगेडतर्फे त्यांनी करोना काळात विशेष योगदान देणाऱ्या महिलांना सन्मानासाठी सोहळाही आयोजित केला होता. विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग होता. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा तरुणांना रोजगारासाठी शासनाकडून बिनव्याजी कर्ज मिळवून देण्यासाठी त्यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.