मोठा निर्णय : पुण्यात आणखी पाच माेठी रुग्णालये पालिकेच्या नियंत्रणाखाली

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभागातील बेड्स वाढणार

पुणे  – महापालिकेने पाच खाजगी रुग्णालयांतील बेड्स नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील बेड्सचे नियंत्रण पालिकाच करणार आहे. याठिकाणी गरजू रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्याची यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे.

शहरात करोनाचे गंभीर रुग्ण वाढत असताना ग्रामीण तसेच अन्य शहरांतील रुग्णही पुण्यात उपचारांसाठी येत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभागातील बेड मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे उपचारास विलंब होऊन रुग्णही दगावत आहेत. यासंदर्भातील तक्रारींवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याना चांगलेच फैलावर घेतले. महापालिकांच्या माध्यमांतून शहरातील विविध रुग्णालयांतील बेडचे नियंत्रण करण्याचे आदेश दिले आहेत.

यात येरवड्यातील सह्याद्री हॉस्पिटल, कात्रज येथील भारती हॉस्पिटल, हडपसर येथील नोबल हॉस्पिटल, कोरेगाव पार्क येथील बुधरानी हॉस्पिटल आणि सदाशिव पेठेतील पूना हॉस्पीटलमधील करोना बाधितांसाठीच्या बेडचे नियंत्रण महापालिका करणार आहे.

रुग्णांकडून बेडची मागणी आल्यानंतर महापालिकेने करार केल्यानंतरच ही रुग्णालय करोना रुग्णांना दाखल करून घेणार आहे. जिल्हा तसेच अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांसाठी काही बेड रिझर्व्ह ठेवण्यात येणार असून, त्याचा निर्णय संबधित हॉस्पिटलवरच राहणार आहे, असे डॉ. गोयल यांनी सांगितले.

उपरोक्त पाचही खाजगी हॉस्पिटल्ससोबत महापालिकेने यापूर्वीच करार केलेला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र असलेल्या रुग्णांचे उपचार या योजनेतील अटी-शर्तींनुसारच होणार आहेत. तसेच पूर्वीप्रमाणे अन्यखर्चाची जबाबदारी संबंधित रुग्णांचीच राहाणार आहे. केवळ अत्यवस्थ रुग्णांना त्वरित बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी अधिक नियोजनबद्ध यंत्रणा राबवण्यासाठीचे नियंत्रण महापालिकेकडे राहील.

– डॉ. शांतनु गोयल, अतिरिक्त आयुक्त, मनपा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.