न्यूयॉर्क – युक्रेन युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर होणार असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक खाद्य कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक डेविड बिसले यांनी म्हटले आहे. ते काल संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत बोलत होते.
गव्हाचा सगळ्यात मोठा निर्यातदार देश आज युद्धाच्या संकटाचा सामना करत आहे, त्यामुळे आधीच उंचावर गेलेले खाद्य पदार्थांचे भाव आणखी वाढणार अस्याचे संकेत त्यांनी दिले. या आधी खाद्य कार्यक्रमांतर्गत 125 दशलक्ष परिवारांना शिधा पुरवला जायचा पण या युद्धामुळे शिधा कमी करावा लागत आहे, असेही त्यांनी सांगितले. युक्रेनमध्ये जगाच्या 30 टक्के गहू, 20 टक्के मका आणि 75 ते 80 टक्के सुर्यफुलाच्या बिया पिकवल्या जातात.
रशिया युक्रेन युद्धामुळे युरोपात दुसऱ्या विश्वयुद्धानंतरची सर्वात मोठी शरणार्थी समस्या निर्माण झाली आहे असे संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे. या युद्धामुळे पोलंड, रोमानिया, माल्दोवा, हंगेरी, स्लोव्हाकिया तसंच रशियामध्ये निर्वासितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे आतापर्यंत 30 लाखांहून अधिक लोक निर्वासित झाले असून ही संख्या वाढत जाईल असे संयुक्त राष्ट्र संघाचे पोलंडमधले समन्वयक लेक्स मंड यांनी सांगितले.