सातारा -जिल्ह्यातील विविध विलगीकरण कक्षात 47 संशयितांना दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झालेल्या पाच महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात 20 एप्रिल रोजी मृत्यू झालेल्या 32 वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्याशिवाय आणखी 22 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात 20 एप्रिल रोजी मृत्यू झालेल्या 32 वर्षीय पुरुषाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 17, कृष्णा मेडिकल कॉंलेजमधील 5 व कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील 1 अशा एकूण 23 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 2, आरोग्य कर्मचारी 1, बाहेर जिल्ह्यातून प्रवास करुन आलेले 3 व सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील 12 तर कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 4, सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासतील 24 व कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील बाधित रुग्णाचा निकट सहवासातील 1 अशा एकूण 47 जणांना संशयित म्हणून बुधवारी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या 41 संशयितांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कृष्णा मेडिकेल कॉलेजमधील संशयित रुग्णांमध्ये पाच महिन्यांच्या पुरुष जातीच्या बाळाचा समावेश असून त्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.