नवी दिल्ली : एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह दिल्लीच्या भजनपुरा भागातील घरात संशयास्पदरित्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यूचे कारण निश्चित करता आले नाही.
पोलिसांना याबाबत शेजाऱ्यांनी दुपारी साडे अकराच्या सुमारास कळवले. घरातून वास येत आहे. तसेच गेले अनेक दिवस या घराचे दार उघडत नसल्याचे पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी दार फोडून घरात प्रवेश केला. त्याचेळी तेथे दोन पुरूष आणि दोन महिलांचे मृतदेह आढळले.
या मृतदेहांची ओळख पटली असून ते एकाच कुटुंबातील आहे. यातील कर्ता पुरूष हा रिक्षा चालक होता. शंभू (वय 43) त्याची पत्नी सुनिता (वय 38) त्यांची मोठी मुलगी 16 वर्ष आणि तीन 14 आणि 12 वर्षांची दोन मुले यांचा समावेश आहे.
हे कुटुंब येथे सहा सात महिन्यापासून रहात आहे. हे मृतदेह अनेक दिवसांपासून पडले असावेत, अशी शंका आहे. न्यायवैद्यक पथक घटनास्थळावर पाचारण करण्यात आले आहे, असे पोलिस सह आयुक्त अलोक कुमार यांनी सांगितले.
अत्यांत कुजलेल्या अवस्थेतील हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच घटनास्थळावर कोणतीही चिठ्ठी सापडली नाही, असे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.