आपटीत आगीमुळे पाच घरे खाक

65 लाखांचे नुकसान : पाच कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी; अंगावरील कपड्यांशिवाय काहीच उरले नाही

भोर – महाड-पंढरपूर मार्गालगत असलेल्या हिर्डोशी खोऱ्यातील आपटी येथील पाच घराला मंगळवारी (दि. 18) मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने पाच कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. पाचही कुटुंबातील नागरिकांच्या अंगावरील कपड्यांशिवाय या त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहीले नसून या साऱ्यांचे प्रपंच ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उघड्यावर पडले असून या आगीत सुमारे 65 लाखांचे नुकसान झाले असल्याचे शासकीय पंचनाम्यानुसार समोर आले आहे. तर या घटनेत एका व्यक्‍तीसह गाय व वासरू भाजले आहे.

लक्ष्मण जाणू पारठे, सरुबाई गणपत पारठे, श्रीपती धोंडीबा साळेकर, चंद्रकांत बाळू साळेकर, आणि खंडू बाळू साळेकर या पाच कुंटुंबांचा संसार या आगीमुळे उघड्यावर आला आहे. तर श्रीपती धोंडीबा साळेकर हे या घटने 25 ते 30 टक्‍के भाजले आहेत. याबाबतची माहिती अशी की, पाचही घरातील नागरिक गाढ झोपेत असताना मध्यरात्री गाय आणि वासरु यांच्या हंभरड्याचा आवज आल्याने श्रीपती साळेकर यांना जाग आली त्यावेळी आग लागल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड करून सगळ्यांना जागे केले. तर आरडाओरडीमुळे सारे गावच जागे झाले व ते तातडीने आग विझवण्यासाठी धावले. नागरिकांनी गावच्या नळपाणी पुरवठ्याच्या पाइपची जोडाजोड करुन अडीच ते तीन तास आग विझवण्यासाठी शर्थीची पराकाष्ठा करुन आग विझवण्यात यश मिळवले. यानंतर भोर नगरपालिकेचा अग्निशमन बंबही घटनास्थळी दाखल झाला. पाच वाजण्याचे सुमारास पोहोचलेल्या या अग्निशमन बंबाने उरली सुरली आग विझवली. मात्र, या घटनेत पाचही घरे जळून खाक झाली होती.

घटनेची माहिती भोरचे तहसीलदार अजित पाटील, पोलीस निरीक्षक राजू मोरे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंडलाधिकारी पांडुरंग लहारे, गावकामगार तलाठी स्वप्निल आंबेकर, ग्रामसेवक विशाल आनंदकर यांनी घटनेत झालेल्या नुकसानीचा ग्रामस्थांसमोर पंचनामा केला असून प्रत्येक कुटुंबाचे सुमारे 13 लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचे आनंदकर यांनी सांगितले. दरम्यान, आगीत जखमी झालेल्या श्रीपती साळेकर यांच्यावर भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात तर भाजलेल्या गाय वासरावर पशु वैद्यकिय अधिकारी डॉ. हाके यांनी उपचार करुन औषधोपचार सुरू केले आहेत.

पाचही कुटुंबे शेतकरी असून त्यांची या घटनेत मोठी हानी झाली आहे. शासनाच्या अनुज्ञेय नियमानुसार आर्थिक तातडीची मदत दिली जाईल.
– अजित पाटील, तहसीलदार, भोर

गाय-वासरु ठरली पाच कुटुंबांची “माय’
आपटी येथील घराला राञीचे वेळी अचानक लागलेल्या आगित गोठ्यात बांधलेल्या गाय आणि वासराच्या अंगावर आगीचे लोळ पडल्याने त्यांनी मोठा हांबरडा फोडला आणि गाढ झोपेत असलेले सारेच जागे झाले. म्हणून कोणतीही जीवीत हानी झाली नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे गोठ्यातली गाय-वासरुच ही या शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने “माय’च ठरली आहे.

पंचायत समितीकडून अडीच लाखांची मदत
भोर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे, सभापती मंगल बोडके, उपसभापती श्रीधर किंद्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. यावेळी या पाचही कुटुंबांना पंचायत समिती शेष फंडातून 2 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असे उपसभापती श्रीधर किंद्रे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.