सफाई कर्मचारी नाही ,म्हणून “पोस्टमॉर्टेम’वर फुली

शवविच्छेदन कक्ष नावापुरता : कान्हे फाटा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची ससेहोलपट

“पोस्टमॉर्टेम’बाबतचे गैरसमज…

कोणताही अनैसर्गिक, संशयित मृत्यू, आत्महत्या किंवा पोलिसांनी शिफारस केली, तर मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करावे लागते. पण मृताचे नातेवाईक अनेकदा पोस्टमॉर्टेम नको, असा आग्रह धरतात. मात्र अशा प्रकरणात नियमाप्रमाणे व दंड विधानसंहितेतील तरतुदीनुसार पोस्टमॉर्टेम करावे लागते. कायद्याने हे होत असल्याने त्यातून कोणालाही सूट देता येत नाही, हे सर्वप्रमथ सर्वसामान्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. पोस्टमार्टेम करताना मृताचे सर्व अवयव काढून घेतले जातात, असा अनेकांचा गैरसमज आहे. पण तसे नसते. शरीराला काही विशिष्ट ठिकाणी छेद देऊन डोके, छाती, प्लिहा, किडनी. लिव्हर आदी अवयवांवर झालेला परिणाम तपासला जातो. त्यामुळे मृत्यू नेमका कशामुळे झाला स्पष्ट होते.

वडगाव मावळ – कान्हे फाटा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय (वडगाव मावळ) शवविच्छेदन कक्षात शवविच्छेदन करणारा सफाई कामगार नसल्याने “पोस्टमॉर्टेम’ होत नाही. त्यामुळे येथील शवविच्छेदन कक्ष नावापुरतेच असल्याचे अधोरेखित झाले आहे. मावळ तालुक्‍यातील खंडाळा, कामशेत, कान्हे व तळेगाव दाभाडे आदी ठिकाणी शवविच्छेदन कक्ष आहेत. त्याठिकाणी शवविच्छेदन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तालुक्‍यातील शवविच्छेदनाचा ताण तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रावर येतो. वैद्यकीय कायद्यानुसार शवविच्छेदन हे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करणे क्रमप्राप्त आहे; मात्र केवळ शवविच्छेदन करणारा कर्मचारी नसल्याने शवविच्छेदन करण्यास वैद्यकीय अधिकारी पळवाट शोधत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

पुणे-मुंबई दोन महानगराच्या मध्यवर्ती वसलेल्या मावळ तालुक्‍यात जुना पुणे-मुंबई महामार्ग, तळेगाव दाभाडे-चाकण राज्यमार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग तसेच पुणे-मुंबई लोहमार्ग आहे. या मार्गावर दैनंदिन होणाऱ्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक असते. तसेच मावळातील जमिनीला सोन्याचा भाव आल्याने जमिनीतून उद्भवणारे तंटे, निवडणुकीच्या वादातून होणारे खून तसेच आकस्मिक व संशयास्पद मयत आदींचे विच्छेदन करणे अत्यावश्‍यक असते. अनेक वेळा मयतांचे शवविच्छेदन अहवाल नसल्यास विमा व मृत्यू दाखल मिळण्यास अडथळा होतो.

मावळ तालुक्‍यात खंडाळा, कामशेत व कान्हे आदी ठिकाणी लाखो रुपयांच्या निधीतून शवविच्छेदन कक्ष उभारले आहेत. पण याठिकाणी प्रशिक्षित शवविच्छेदन करणारा सफाई कर्मचारी उपलब्ध नाही. हेच कारण पुढे करीत वैद्यकीय अधिकारी शवविच्छेदन करण्यास टाळाटाळ करीत आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे पोलीस व नातेवाइकांना दुसरीकडे जाण्याचा सल्ला देतात. त्यातच जबाबदारी टाळण्यासाठी मृतदेह जिवंत असून, उपचारासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (वायसीएम) रुग्णालयाकडे बोट दाखविले जाते. रुग्णालयाच्या या भूमिकेमुळे पोलीस व नातेवाईक यांची आर्थिक, मानसिक व शारिरीक छळवणूक होते. शवविच्छेदन कक्षातच देहाचे विच्छेदन करण्यात यावे, तसेच प्रत्येक ठिकाणी मृतदेह ठेवण्यासाठी शीतगृह उभारण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अतुल वायकर, सोमा भेगडे, आशिष खांडगे, भूषण मुथा, अतुल राऊत, शरद मोरे आदींनी केली.

शीतगृहाअभावी पोलीस, नातेवाईकांची फरफट मावळ तालुक्‍यातील खंडाळा, कामशेत, कान्हे येथे शासकीय ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन कक्षात मृतदेह ठेवण्यासाठी शीतगृह नाहीत. तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये पैसे देवून मृतदेह ठेवावा लागतो. तालुक्‍यातील तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात महिन्याला सुमारे 27 ते 30 पर्यत शवविच्छेदन केले जातात. त्यातच पोलीस व नातेवाईक खंडाळा, कामशेत व कान्हे या ठिकाणी न जाता तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह घेवून येतात. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे व गरजेनुसार सेवानिवृत्त कर्मचारी लिंबाजी मोरे उपलब्ध असल्याने याठिकाणी शवविच्छेदन केले जाते. कान्हे शासकीय ग्रामीण रुग्णालय असून, त्या ठिकाणी शवविच्छेदन होत नाही हीच मोठी गैरसोय आहे. त्यामुळे तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रावर ताण पडतो. त्यात पोलीस व नातेवाईकांची दमछाक होते. अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळ होतो. तसेच मृतदेहाचा “व्हिसेरा’ पोलीस वेळेत घेत नसल्यास तपास वेळेत पूर्ण होत नाही.

तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातच शवविच्छेदन केले जाते. अन्य ठिकाणी वेगवेगळी कारणे देऊन पोलीस व नातेवाइकांना अन्यत्र रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात. वैद्यकीय अधिकारी आपली जबाबदारी झटकून देतात. या घटनेमुळे पोलीस व नातेवाइकांना मनस्ताप होतो. कायद्यानुसार तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच शवविच्छेदन करण्याचा नियम असताना, हे नियमच धाब्यावर बसविला जात आहेत.

– हरीश दानवे, सामाजिक कार्यकर्ते.

शवविच्छेदन हे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच करावे फक्‍त शवविच्छेदन करणारा सफाई कर्मचारी हा सहाय्यक असतो; पण त्यामुळे शवविच्छेदन करणे टाळता येणार नाही. मावळ तालुक्‍यात सर्वाधिक शवविच्छेदन तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात होतात. जर शवविच्छेदन करण्याची टाळाटाळ होत असल्यास त्यांची नातेवाईकांनी तक्रार करावी.

– डॉ. चंद्रकांत लोहारे, आरोग्य अधिकारी, मावळ.

Leave A Reply

Your email address will not be published.