सातारा – ऑनलाइन पार्टटाइम नोकरीचा मेसेज मोबाइलवर पाठवून, वेगवेगळ्या टास्कवर रक्कम भरून घेत, नागराजू शंकरराव पेरुवाला (सध्या रा. संगमनगर, सातारा, मूळ रा. तेलंगणा) यांना साडेपाच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी नागराजू पेरुवाला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हा प्रकार दि. 5 ते 7 मार्च दरम्यान घडला. नागराजू पेरुवाला हे घरी असताना त्यांच्या मोबाइलवर दुसऱ्या मोबाइलवरुन ऑनलाइन पार्टटाइम नोकरीबाबत मेसेज आला. त्यामध्ये एक लिंक होती. ही लिंक ओपन केल्यानंतर अज्ञाताने मेसेज करून सांगितले की, तुम्हाला टास्क पूर्ण करायचा आहे. त्यानुसार मोबदला मिळेल. हा टास्क पूर्ण केल्यानंतर काही रक्कम पेरुवाला यांना मिळाली.
त्यानंतर अज्ञाताने असेच काही टास्क देऊन, पेरुवाला यांना काही रक्कम भरायला सांगितले. त्याप्रमाणे पेरुवाला यांनी रक्कम भरली. त्यानंतर त्यांना कोणताही मोबदला मिळाला नाही. अज्ञाताने प्रोसेसिंग अन् टॅक्सची रक्कम भरायलाही सांगितले. अशा प्रकारे पाच लाख 54 हजार रुपये भरून घेत पेरुवाला यांची फसवणूक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर करत आहेत.