पुणे – ससून रुग्णालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. अभ्यास न झाल्याने आलेल्या नैराश्यातून प्रथम वर्षाला शिकत असलेल्या तरुणीने बुधवारी (दि. 29) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हे कृत्य केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला तत्काळ उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
अदिती दलभंजन (वय 20, रा. आनंदनगर, सिंहगडरोड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अदिती ही आपल्या आईवडिलांबरोबर आनंदनगर येथे राहण्यास असून, ती अभ्यासात अतिशय हुशार होती. तिने चांगल्या पद्धतीने अभ्यास करून व चांगले गुण संपादन करून बीजे मेडिकलला प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. परंतु तिच्या परीक्षेचा अभ्यास न झाल्याने तिला नैराश्य आले होते. तिने वडिलांना याची कल्पना देखील दिली होती. बुधवारी सकाळी तिचे वडिल तिला नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये सोडून गेले. परंतु अभ्यास न झाल्याने तिने ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिने आत्महत्या करताना तिचा मोबाइल टेरेसवरच ठेवला होता. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहे. याविषयी बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील म्हणाले, ती आज नेहमीप्रमाणे कॉलेजला आली होती. त्यावेळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तिने ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर जाऊन उडी मारली. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.