कामशेत पोलिसांची कामगिरी ः 24 तासात आरोपींना केले जेरबंद
कामशेत – ताजे येथील आयूब याकुब शेख याच्या खून प्रकरणातील पाच आरोपींना कामशेत पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत गजाआड ढकलले आहे. पिंपळोली गावाच्या हद्दीत जीवे मारण्याची सुपारी घेतल्याच्या संशयावरून मित्रानेच आयूबचा खुन केला होता. याप्रकरणात वापरण्यात आलेल्या गाडीच्या आधारे व गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे कामशेत पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाच आरोपींना अटक केले आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि. 2) रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास आयूब शेख याचे मित्र खंडू भगवान कुटे, अविनाश उर्फ लालू भगवान कुटे, नवनाथ उर्फ बॅटरी अंकुश केदारी, बाबाजी सावळाराम केदारी, प्रकाश बबन चिंचवडे, योगेश सुरेश केदारी, सुरज नवनाथ काटे ( सर्व रा. ताजे) यांनी आयूबला ताजे गावातील त्याच्या राहत्या घरातून घेऊन गेले. पिंपळोली गावाच्या हद्दीमध्ये पिंपळे मळा येथे गेल्यावर रात्री 12 वाजल्याच्या सुमारास खंडू कुटे याची सुपारी घेतल्याचा संशय घेऊन आयूबच्या डोक्यावर व चेहऱ्यावर कोणत्यातरी जाड हत्याराने मारहाण करून त्यांची हत्या केली. आरोपींनी आयूबचे प्रेत कार ( क्र. एम एच 06 बी ई 7154) च्या डिकीत ठेवले व कार तिथेच सोडून आरोपी फरार झाले होते.
याप्रकरणी तपासी अधिकारी नीलकंठ जगताप यांनी खबऱ्या मार्फत माहिती मिळवत आवघ्या चोवीस तासाच्या आत ताब्यात घेतले असून या प्रकरणातील आरोपी खंडू भगवान कुटे, नवनाथ उर्फ बॅटरी अंकुश केदारी यांना अद्याप अटक झालेली नाही. तर अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार संतोष घोलप, महेश दौंडकर, समीर शेख, सस्ते, बाळकृष्ण भोईर, दरेकर, डावखर, राम कानगुडे, पवार , संदीप शिंदे, धेंडे , ढगे, गावडे या पथकाने केली आहे.