पुणे – बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून सध्या येरवडा कारागृहात असलेल्या महेश राऊत याला इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. विशेष न्यायाधिश किशोर वढणे यांच्या न्यायालयाने ही परवानगी दिली आहे.
राऊत याने मानवाधिकार आणि गांधी विचार या विषयात पदविकेला (डिप्लोमा) प्रवेश घेता यावा, यासाठी अर्ज केला होता. मात्र, राऊत हा कोरेगाव भिमा सारख्या संवेदनशील खटल्यातील संशयित आरोपी असून खटला सुरू असणाऱ्या इतर लोकांसोबत संपर्क येवू नये म्हणून पदविका करण्यासाठी परवानगी नाकारण्यात यावी, असे कारागृह प्रशासनाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले होते. यावर राऊत यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, 21 जानेवारीपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्तविद्यापीठाचे एक केंद्र येरवडा कारागृहात सुरू करण्यात आले आहे. पदविकेचा अभ्यासक्रम असल्याने तासांना हजेरी लावण्याची गरज नाही. मुक्त विद्यापीठात मानवाधिकार आणि गांधी विचार पदविकेसाठी प्रवेश घ्यायचा. पुस्तके मिळतील आणि त्यानंतर परीक्षा केंद्रामध्ये जावून परिक्षा द्यायची आहे. यामुळे या पदविकेसाठी राऊत यांना परवागी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.