4 ते 12 नोव्हेंबर कालावधी : कार्यक्रमांची मेजवानी पुणेकरांना अनुभवता येणार
पुणे – सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहराला नाटकाची विशेषत: संगीत नाटकाची एक मोठे परंपरा आहे. संगीत नाटक या कलेची अनुभूती रसिकांना मिळावी यासाठी पुण्यात प्रथमच संगीत नाट्य आणि नाट्य-तंत्रज्ञ संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संगीत नाट्य कलावंतांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, नाट्यसंगीतावर आधारित चित्रफित सादरीकरण, नाट्यसंगीत भेंड्या अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी पुणेकरांना अनुभवता येणार आहे.
भरत नाट्य संशोधन मंदिर आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले संगीत नाट्य संमेलन, पहिले मराठी नाट्य-तंत्रज्ञ संमेलन आणि मराठी नाट्यसंगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. 4 ते 12 नोव्हेंबर 2019 या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे होत असून रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे, अशी माहिती भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे आणि संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
पहिल्या संगीत नाट्य संमेलनानिमित्त शंभर वर्षांतील संगीत नाट्य कलावंतांच्या छायाचित्रांची प्रदर्शनी भरविण्यात येणार असून त्याचे उद्घाटन 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता प्रसिद्ध शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्या हस्ते होणार आहे. तर 7 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजता नाट्यसंगीत भेंड्या रंगणार आहेत.
याचे उद्घाटन ज्येष्ठ कलावंत दीप्ती भोगले यांच्या हस्ते होणार असून भेंड्यांमध्ये चारूदत्त आफळे, संजीव मेहेंदळे, भक्ती पागे, गौरी पाटील, कविता टिकेकर यांचा सहभाग असेल.
संवाद, परिसंवाद रंगणार
पहिल्या मराठी नाट्य-तंत्रज्ञ संमेलनांतर्गत 8 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 10.30 वाजता श्रीनिवास भणगे हे “नाट्यलेखन’ या विषयावर, विजय केंकरे हे “दिग्दर्शन’ या विषयावर, प्रदीप मुळ्ये हे “नेपथ्य’ या विषयावर, राहुल रानडे हे “संगीत’ या विषयावर प्रदीप वैद्य हे “प्रकाशयोजना’ या विषयावर, किरण यज्ञोपवित हे “प्रकाशयोजनेची किमया’ या विषयावर, चैत्राली डोंगरे या वेशभूषा या विषयावर तर प्रभाकर भावे हे रंगभूषा या विषयावर संवाद साधतील. 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता “समीक्षा’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात ज्येष्ठ अभिनेते माधव वझे तसेच सीमा भानू, राज काझी, अरुण दडीगावकर यांचा सहभाग असणार आहे. त्यांच्याशी चिन्मय पाटणकर संवाद साधतील.