कर्जत, (प्रतिनिधी) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये जि. प. प्राथमिक शाळा बेलगावने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सदर शाळा डिजिटल शाळा, वाचनालय , क्रीडांगण , गुणवत्ता, परसबाग, बगीचा, खेळणीने समृद्ध असून शाळेत CSR च्या माध्यमातून मल्टी पर्पझ हॉलचे 27 लाखांचे काम झाले आहे. विद्यार्थी गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांचा प्रत्येक उपक्रमात कृतीयुक्त सहभाग असतो. विद्यार्थ्यांनी केंद्र व तालुका पातळीवर विविध स्पर्धेत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.
शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, आनंदी बाजार, बालआनंद मेळावा असे अनेक उपक्रम राबवले जातात. संपूर्ण बेलगाव ग्रामस्थ , ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती , पालक यांच्या सहकार्याने तालुक्यातील आदर्श शैक्षणिक संकुल येथे उभारले गेले आहे. तालुक्यातील व जिल्ह्यातील एक अग्रणी व गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून ही शाळा आपला नावलौकिक मिळवत आहे