टाकळीभान, (वार्ताहर) – महाशिवरात्रीनिमित्त येथील पुरातन शंभो महादेवाच्या मंदिरात्र महाशिवरात्री उत्सवाचे प्रथमच भव्य आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमेटी व आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
टाकळीभान परिसराचे ग्रामदैवत असलेल्या येथील पुरातन महादेव मंदिरात शुक्रवार दि.८ मार्च रोजी महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता गंगाजलाने शंभु महादेवाचा अभिषेक, सकाळी ६.३० ते ९.३० पर्यंत लघु रुद्राभिषेकाचे पौराहित्य सुदाम गुरु देवळालकर करणार आहेत.
सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत निल्लोड फाटा ता. सिल्लोड येथील रामेश्वर महाराज पवार यांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तन सेवा होणार आहे. दुपारी १२.३० नंतर दानशुरांच्या लोकसहभागातून जमा झालेल्या एक हजार किलो साबुदाना खिचडी प्रसाद व ३०० डझन केळी प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता टाकळीभान आणि पंचक्रोशितील भजनी मंडळांचा जागर होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे.