पुणे -चांदणी चौकातील नवीन उड्डाणपुलाचा पहिला गर्डर आज बसविण्यात आला. पुढील आठ ते दहा दिवसांत गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावरील स्लॅब आणि रस्त्याचे काम पूर्ण होईल. त्यामुळे एनडीए, बावधन, मुळशी, कोथरूडकडून इच्छितस्थळी जाणाऱ्या वाहनांसाठी हा उड्डाणपुल खुला होताच वाहनचालकांना घालावा लागणारा वळसा वाचणार आहे. चांदणी चौकातील नवीन उड्डाणपूल आणि रस्तारुंदीकरणाचे काम 92 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे.
आता महामार्गावरील मुख्य चौकातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, काल (दि. 4 जुलै) मध्यरात्रीपासून या पुलावरील गर्डर टाकण्याच्या कामालाही सुरुवात झाली. रात्री साडेबारा ते पहाटे साडेतीन या वेळेत महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवून पुढील दहा दिवस (दि. 14) हे काम सुरू राहणार आहे.
काम कसे होणार?
चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी नवीन टेक्नोलॉजी वापरून एकूण 10 गर्डर टाकण्यात येणार आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत पिलरवर गर्डर ठेवण्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर त्यावर पक्के कॉंक्रिटीकरण करून अंतिम रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूचे कठडेही सिमेंटचे उभारण्यात येणार असून, मागील आठ दिवसांपासून या कामाने वेग धरला आहे.
54 ते 57 मीटर लांबीचे गर्डर…
महामार्गाच्या दोन्ही बाजूला कोथरूड, मुळशी, मुंबई, बावधन, एनडीए या ठिकाणी जाण्यासाठी अरुंद रस्ते तयार करण्यात आले. तर चांदणी चौकातील मुख्य उड्डाणपुलासाठी या रस्त्यांवर पिलर उभारून त्यावर गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले. आता अंतिम टप्प्यात महामार्गावरील पुलावर क्रेनच्या सहाय्याने गर्डर टाकण्याचे काम सुरू झाले आहे. हे गर्डर 54 आणि 57 मिटर लांब आहेत.