पुणे – स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयात नव्या धोरणाची अंमलबजावणी करावी लागणार आहे, असा निर्णय उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे.
आता स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात अभ्यासक्रम चार वर्षांचाच राहणार असून, एका वर्षात दोन सेमिस्टर राहणार आहे. विद्यार्थ्यांना एका सेमिस्टरमध्ये किमान 20, तर कमाल 22 क्रेडिट्स मिळवता येणार आहे. पहिल्या वर्षाचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे प्रमाणपत्र, तर दोन वर्षांचे शिक्षण घेतल्यानंतर डिप्लोमा मिळणार आहे. त्याचप्रमाणे पहिल्या तीन वर्षांच्या शिक्षणानंतर बी.व्होक. किंवा बी.एस्सी. इन इंजिनिअरिंगची पदवी मिळणार आहे.
अशा असतील संधी, सुविधा
- एका शाखेतून इतर शाखेत प्रवेशाची मुभा
- सर्व शाखांमधील आवडीच्या विषयांचे शिक्षणाची सोय
- प्रत्येक वर्षानंतर मल्टिपल एन्ट्री आणि एक्झिटची संधी
- आंतरविद्याशाखीयद्वारे अन्य महाविद्यालय व विद्यापीठात शिक्षणाची संधी.
- ऑन जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप
- ऑनलाइन, ऑफलाइन, दूरशिक्षणातून शिक्षणाची संधी