पुणे – देशपातळीवर कौतुकास पात्र ठरलेला; पण गेल्या वर्षी पूरपाण्यामुळे महापालिकेला टीकेचे धनी व्हावे लागलेल्या जंगली महाराज रस्त्यावरील पूरस्थितीचे रहस्य अखेर महापालिकेला उलगडले आहे. या रस्त्यावर 600 मिमी व्यासाच्या पावसाळी वाहिन्या टाकल्या असून, प्रत्यक्षात चेंबरमधून या वाहिन्यांत पाणी जाण्यासाठी जोडण्यात आलेल्या कनेक्शन लाइन अवघ्या 200 मिमी व्यासाच्या असल्याचे चेंबर खोदाईतून स्पष्ट झाले. त्यामुळे त्यातून पुरेसे पाणी न जाता ते रस्त्यावरच साचून राहत आहे. परिणामी या रस्त्यावर पूरस्थिती ओढावत असून, महापालिकेने आता या लाइन बदलून 600 मिमी व्यासाच्या टाकण्याचे काम हाती घेतले आहे.
महापालिकेने 20 कोटी रुपये खर्चून जंगली महाराज रस्ता “अर्बन स्ट्रीट प्रोग्रॅम’अंतर्गत विकसित केला. या रस्त्याच्या कामाचे देशपातळीवर कौतुक झाले. केंद्र सरकारकडून याबद्दल महापालिकेचा गौरवही करण्यात आला. मात्र, या रस्त्यावर पावसाळी वाहिन्यांच्या कामात मोठी चूक झाल्याने मागील वर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर पूरस्थिती उद्भवल्याने महापालिकेला टीकेचा सामना करावा लागला होता. महापालिकेला ही चूक वर्षभरानंतर निदर्शनास आली आहे.
रस्त्यासाठी 600 मिमी व्यासाच्या पावसाळी वाहिन्या टाकल्या असल्या तरी प्रत्यक्षात चेंबरमधून या पावसाळी वाहिनीत पाणी जाण्यासाठी जोडण्यात आलेल्या कनेक्शन लाइन अवघ्या 200 मिमी व्यासाच्या बसविण्यात आल्या होत्या. त्यातच, पाण्याचे अधिक प्रमाण आणि या छोट्या आकाराच्या वाहिन्यांमध्ये कपडे, कचरा तसेच प्लॅस्टिकचा कचरा अडकल्याने पावसाळी वाहिन्यात पाणी न जाता ते रस्त्यावरच साचून राहत होते.
मागील वर्षी उद्भभवलेल्या पूरस्थितीनंतर यंदाही शहरात पूर्वमोसमी पावसाने जंगली महाराज रस्त्यावर अनेक भागांत पाणी साचले होते. त्यामुळे प्रशासनाने पावसाळी वाहिन्यांची तपासणी करण्यासाठी चेंबर खोदले. यावेळी कनेक्शन लाइन मुख्य वाहिनीच्या तुलनेत दुप्पट छोट्या असल्याचे समोर आले. त्यामुळे ड्रेनेज विभागाने 600 मिमी व्यासाच्या वाहिन्या बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
साडेचार कोटींची निविदा
आता या रस्त्यावरील पूरस्थिती कामयची रोखण्यासाठी महापालिकेने सुमारे साडेचार कोटींची निविदा काढली. तसेच रस्त्यावर येणारे पावसाचे पाणी रोखण्यासाठी फर्गसन महाविद्यालय टेकडीच्या परिसरात पाणी साचण्यासाठी चर खोदण्यात आले असून, त्यासाठीही प्रशासनास मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला आहे.
नेमकी चूक काय?
- महापालिकेकडून पावसाळी वाहिन्या रस्त्याच्या कडेने टाकून त्यावरच चेंबर तयार केले जातात.
- त्यामुळे पावसाचे पाणी या चेंबरमधून थेट पावसाळी वाहिनीत जाते.
- जंगली महाराज रस्त्यावर महापालिकेने पावसाळी वाहिन्या फूटपाथच्या खाली तर चेंबर रस्त्याच्या कडेला बसविले.
- त्यामुळे चेंबरमध्ये जमा झालेले पाणी पावसाळी वाहिनीपर्यंत घेऊन जाण्यासाठी कनेक्शन लाइन टाकण्यात आल्या.
- प्रत्यक्षात केवळ 200 मिमी व्यासाची लाइन टाकण्यात आली.
- त्यामुळे मागील वर्षी चेंबरमधून पावसाचे पाणी पावसाळी वाहिनीतून क्षमतेने न वाहिल्याने रस्त्यावर पाणी साचले.