लंडन – एकाच वेळी 3 वेगवेगळ्या व्यक्तींचे “डीएनए’ वापरून एका बाळाचा जन्म घडवण्याचे तंत्रज्ञान ब्रिटनमध्ये यशस्वी झाले आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रायोगिक वापराला यश आले असून या तंत्रज्ञानाद्वारे पहिल्या बालकाचा जन्म झाला असल्याचे ब्रिटनमधील तज्ज्ञांनी म्हटले आहे. अनुवंशिक रोगांपासून बालकांना वाचवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात आला आहे. ब्रिटनमधील “ह्युमन फर्टिलायजेशन ऍन्ड एम्ब्रायोलॉजी ऍथोरिटी’ने या नव्या तंत्रज्ञानाबाबतची माहिती दिली.
या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आतापर्यंत 5 पेक्षा कमी बालकांचा जन्म झाला आहे, असे संस्थेने म्हटले आहे. मात्र या बालकांची आणि पालकांची ओळख पटेल असा कोणताही तपशील संस्थेने उपलब्ध करून दिलेला नाही.
सदोष “मायटोकॉन्ड्रीया’च्या स्रोतातून नवजात बालकांना अनुवंशिक रोग होऊ शकत असतात. अशा सदोष “मायटोकॉन्ड्रीया’पासून महिलांना दूर ठेवण्यासाठीच्या उपाय योजना करण्याबाबतचे विधेयक ब्रिटनमध्ये सर्वात पहिल्यांदा 2015 मध्ये मंजूर झाले होते. अनुवांशिक दोषांमुळे मस्क्यूलर डिस्ट्रोफी, एपिलेप्सी, हृदयाच्या समस्या आणि बौद्धिक अपंगत्व यासारखे आजार होऊ शकतात. ब्रिटनमधील 200 नवजात बालकांमधील एखाद्या बालकाला असे अनुवंशिक आजार असतात.
नवीन तंत्रज्ञानानुसार स्त्रीच्या अंड पेशींचा निरोगी “मायटोकॉन्ड्रीया’ बरोबर संयोग केला जातो. मात्र दाता असलेल्या व्यक्तीच्या अन्य “डीएनए’ला मात्र वगळले जाते. फलन झालेल्या अंडपेशी पुन्हा महिलेच्या गर्भाशयात सोडण्यात येतात. अशा तंत्रज्ञानाने विकसित होणाऱ्या बालकामध्ये नव्या “डीएनए’चा केवळ 1 टक्का अंश असतो.
हे तंत्रज्ञान सिद्ध झाले असे म्हणण्यासाठी सध्या पुरेशी उदाहरणे नाहीत. मात्र न्यूकॅसल युनिव्हर्सिटीचे संशोधक या विषयावर काम करत असून त्यांच्या संशोधनाला लवकरच प्रसिद्धी देतील असे ब्रिटनमधील माध्यमांनी म्हटले आहे.