नवी दिल्ली -“आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सूर्या अक्षरशः गोलंदाजांसोबत खेळत होता. जेव्हा तो अशी फलंदाजी करतो, तेव्हा रस्त्यावरील गल्ली क्रिकेटची अनुभूती देतो. सराव आणि कठोर परिश्रमाने तो अधिक चांगला झाला आहे. त्याचा तळाचा हात खूप मजबूत आहे, जो तो परिपूर्णतेने वापरतो.
आरसीबी विरुद्ध त्याने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दिशेने फटके मारून सुरुवात केली आणि नंतर मैदानात सर्वत्र शॉट्स खेळले,’ अशा शब्दांत दिग्गज सुनील गावसकर यांनी मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याचे कौतुक केले आहे.
पाच पुरस्कारांसह लाखोंची कमाई
या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सूर्यकुमार यादवला सामनावीरासह एकूण 5 पुरस्कार देण्यात आले. ज्यामध्ये सामन्यात सर्वाधिक चौकार मारण्याचा पुरस्कार, सामन्यातील सर्वात मौल्यवान मालमत्ता, ड्रीम 11 गेम चेंजर ऑफ द मॅच, इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द मॅच अशा पुरस्कारांचा समावेश होता. या सर्व पुरस्कारांमध्ये सूर्याला प्रत्येकी 1 लाख रुपये मिळाले, त्यामुळे एकाच सामन्यात यातून त्याने तब्बल 5 लाख रुपयांची कमाई केली.