नवा दिल्ली – यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अग्निशामक दलाच्या 86 कर्मचाऱ्यांना अग्निसेवा पदके देण्यात आली आहेत. यापैकी 26 जण त्यांनी दाखवलेले साहस आणि शौर्य यासाठी अग्निसेवा पदकांचे मानकरी ठरले आहेत. तर 10 कर्मचारी उल्लेखनीय सेवा पदकांचे आणि 50 कर्मचारी गुणवत्तापूर्ण सेवा पदकांचे मानकरी ठरले आहेत.
त्याशिवाय गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दलाच्या 55 कर्मचाऱ्यांना गृहरक्षकदल आणि नागरी संरक्षण पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये उल्लेखनीय सेवेसाठी पाच आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 50 पदकांचा समावेश आहे.
राष्ट्रपतींची शौर्य पदके आणि उल्लेखनीय सेवा पदकांबरोबरच शौर्य पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवा पदके अग्निशामक दल, नागरी संरक्षण आणि गृहरक्षकदलाच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी दिली जातात.