मुंबई : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पुणे जिल्ह्यातील एका ट्रस्टला शासनाकडून जमीन अधिग्रहणाच्या भरपाईपोटी मिळणाऱ्या रकमेचा परस्पर अपहार केल्याप्रकरणी तसेच यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची तसेच वक्फ मंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील दोघा जणांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वक्फ मंडळाचे पुणे प्रादेशिक वक्फ अधिकारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी इम्तियाज महम्मद हुसेन शेख (रा. रामनगर, येरवडा, पुणे) आणि चांद रमजान मुलाणी (राहणार सदर) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी आपसात संगनमत करून स्वतःला ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्टचे (मौजे माण, ता. मुळशी, जि. पुणे) अध्यक्ष आणि सचिव असल्याचे भासवून या रकमेचा अपहार केला आहे.
ही बाब लक्षात आल्यानंतर पुणे प्रादेशिक वक्फ अधिकाऱ्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची दखल घेत रकमेचा अपहार करणाऱ्या शेख आणि मुलाणी या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा अपप्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. अशा गैरव्यवहारांचा शोध घेऊन त्याबाबत कठोर कारवाई करण्याच्या सुचना विभागाच्या तसेच वक्फ मंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.