नवी दिल्ली – दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळ लागलेल्या भीषण आगीत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली अग्निशमन संचालक अतुल गर्ग यांनी माहिती दिली की शुक्रवारी (13 मे) संध्याकाळी तीन मजली व्यावसायिक इमारतीला लागलेल्या आगीतून एकूण 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले. तिसऱ्या मजल्याचा शोध घेणे अद्याप बाकी आहे.
प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, ही 3 मजली व्यावसायिक इमारत आहे, ज्याचा वापर सामान्यतः कंपन्यांना कार्यालयासाठी जागा देण्यासाठी केला जातो. जिल्ह्याचे डीसीपी समीर शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सुमारे 25 गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत होरपळून आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत आग आटोक्यात आलेली नाही.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. ज्या ठिकाणी एक सीसीटीव्ही कॅमेरा आणि राउटर उत्पादन कंपनीचे कार्यालय आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दिल्लीचे डेप्युटी चीफ फायर सर्व्हिस ऑफिसर सुनील चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या भीतीने इमारतीवरून उडी मारलेल्या काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही काही लोक इमारतीत अडकले आहेत.