मुंबई – मुंबईतील कुर्ला (Kurla) भागातील एका 12 मजली निवासी इमारतीला शनिवारी मध्यरात्रीनंतर आग (Building Fire) लागली. त्यानंतर अग्निशमन दलाने तेथे राहणाऱ्या सुमारे 60 लोकांना वाचवले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
कोहिनूर रुग्णालयासमोरील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण इमारत क्रमांक 7 मध्ये रात्री 12.10 च्या सुमारास ही घटना घडली, सुटका करण्यात आलेल्यांपैकी 39 जणांना धुरामुळे गुदमरल्याचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “ही आग 12 मजली इमारतीच्या तळमजल्यावरून सुरू झाली आणि ती तिथे ठेवलेल्या इलेक्ट्रिक वायरिंग आणि भंगार साहित्यापर्यंत मर्यादित होती. ती किरकोळ स्वरूपाची होती.
परंतु ज्वाळा वरच्या दिशेने सरकल्या आणि इमारत धुराच्या लोटात बुडाली. यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वीज पुरवठा खंडित केला आणि पहाटे 1.45 च्या सुमारास आग नियंत्रणात आली.