खालापूर, (वार्ताहर) – खालापूर तालुक्यातील ताकई – आडोशी रस्त्यावरील ढेकू गावाजवळ असलेल्या पायरोटास्क एनर्जी कंपनीत आग लागून मशनरी आणि कच्चा माल पूर्णतः जळून खाक झाला आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
खालापूर तालुक्यातील ताकई – आडोशी रस्त्यावरील ढेकू गावाजवळ सोमवारी (दि. १) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पायरोटास्क एनर्जी कंपनीमध्ये शॉटसर्किटमुळे आग लागली. आगीने थोड्या वेळात रौद्ररूप धारण केले.
मशिनवरील कारागीराला आग लागल्याचे समजताच त्याने सर्व कामगार आणि स्टाफला बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दलास आणि खोपोली पोलीस ठाण्यात संपर्क केला. खोपोली अग्निशमन दल.
खोपोली नगरपालिका अग्निशामक दल, टाटा स्टील फायर ब्रिगेड, आलाना फायर ब्रिगेड, कमानी फायर ब्रिगेड, उत्तम स्टील फायर ब्रिगेड, जे. एस. डब्लू. फायर ब्रिगेड, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुप तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांना फोमचा वापर करून दोन तासाच्या अथक प्रयत्नातून आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाला नाही. मात्र, कंपनीचे लाखोचे नुकसान झाले.